एकेकाळी मी कविता लिहिलेली.
कपाट आवरताना रुपारेलची आठवण मिळाली. तर झालं अस की रूपारेल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं लिखाण असलेलं imprint नावाचं वार्षिक मॅगझीन निघत. रूपारेल मध्ये विज्ञान, वाणिज्य, कला अश्या तिन्ही शाखा आहेत. यापैकी विज्ञान आणि कला शाखेची मुलं या मॅगझीनमध्ये लिहायची. कॉमर्सवाले मात्र या सगळ्यापासून दूर.
तर हे काही नव्याने रुजू झालेल्या अकाउंट्सच्या सराना पटेना. Student लोकांचा सर्वागीण विकास (!) व्हायला हवा ह्या मोदीजी विचारांचे ते पाईक. या उद्दात भावनेने त्यांनी नियमितपणे लेक्चर्स अटेंड करण्याऱ्या मुलांच्या पाठी त्यांनी काहितरी लिहा रे असा धोशा लावायला सुरूवात केली. पण मास्तरांनी सांगितलं की त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं हे व्रत आचरणात आणत असल्याने आम्ही लोकांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ही पोरटी ऐकत नाहीसे पाहून मास्तरांनी त्यांचं एक्स्ट्रा क्लास घेण्याचं ब्रह्मास्त्र बाहेर काढल. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि खालील कविता प्रसवली गेली ती देखील त्यांच्याच तासाला मागील बेंचवर बसून. खरतर कॉलेजच्या वार्षिकात आपल नाव बघून गुदगुल्या झाल्या होताच. खोटं का बोला ! पुढचे १० दिवस नातेवाईक, मित्र मैत्रिणीत मिरवण्यात गेलेले.
मिरवून झाल्यानंतर मॅगझीन अडगळीत पडल आणि नवकवयित्रीचा बहरही. (श्या! म्हातारं झाल्याचं फिलिंग आल) . इतक्या दिवसांनी आज सापडलं आणि तेव्हाच लिहिलेलं हे लिखाण बघून आता हसायला आलं.