गोष्ट सांगण हा प्रकार आपल्याला नवीन नाही. आईच्या , आजीच्या गोष्टी ऐकत आपण मोठे होतो. पोवाडा , गवळण इत्यादी साहित्य प्रकार आपल्या परंपरेत आहेत.
उर्दू साहित्यात या गोष्ट सांगण्याच्या प्रकाराला "दास्तानगोई" अस नाव आहे. यातल दास्ता ह्या शब्दाचा अर्थ गोष्ट आणि गोई म्हणजे सांगण. या प्रकाराची सुरुवात मुघल शासन काळात झाली. मुघल राजांच्या दरबारात दस्तांगो म्हणजे गोष्ट सांगणारे हा कलाप्रकार पेश करत. अर्थातच हा प्रकार दरबारी असल्याने पुरुष कलाकारच सादर करत असत. ही कला १९ व्या शतकापर्यंत दिल्ली , लखनौ इथे बराच लोकप्रिय होती. १९२८ साली ही कला सादर करणारे दास्तागो मीर बकर अली यांच निधन झालं आणि ही कला जणू लुप्त पावली. नंतर २००५ साली महमूद फारुकी यांनी या कलेच पुनरुज्जविन केलं.
दास्तां गोइ प्रकाराला विषयाचं बंधन नाही. युद्ध, प्रेम , जादू, धोका , दुःख अश्या कोणत्याही विषयावर दास्ता गोईं सादर करता येते. ऐकण्यार्याच मनोरंजन करण हा मुख्य हेतू .
तर ही कल्पना घेऊन अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर हे दोन दास्तांगो "दास्ता ए बडी बांका " नावाची मुंबई शहर ही थीम असलेली दास्ता गोई सादर करतात. गोरेगावच्या केशव गोरे ट्रस्टच्या सभागृहात या दास्ता गोइचा २५ वा प्रयोग आज पाहायला मिळाला. जवळपास दोन तासाचा हा प्रयोग आवर्जून बघावा असा आहे. किस्से, कहाण्या , चिमखडे बोल, विचार करायला लावणारी वाक्य, अचूक संदर्भ असणाऱ्या आणि योग्य ठिकाणी पेरलेल्या कविता , अधून मधून सांप्रत स्थितीवर घेतलेले चिमटे यामुळे प्रयोग रंगतो. प्रयोगाचा ठराविक असा फॉरमॅट नाही. त्यामुळे प्रेक्षक निवांत होत नाही. पुढे काय असेल ह्याची उत्सुकता निर्माण होते. कुठलीही गोष्ट सांगताना साधी सरळ असली की त्यात काही रस राहत नाही. इथ तस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेलीय. अक्षय आणि धनश्री हे दोघेही प्रचंड ऊर्जा असणारे कलाकार आहेत. त्या उर्जेचा पुरेपूर वापर प्रयोगात झालेला दिसतो. दोघांचं टायमिंग , योग्य वेळी घेतलेल्या जागा प्रयोग रंगतदार बनवतो. काहीसा इतिहासावर आधारित असूनही केवळ घडलेल्या घटनांची जंत्री न राहता ते क्षण आता आपण अनुभवत आहोत असा फिल प्रयोग पाहताना येतो. मुंबापुरीची चांगली वाईट वैशिष्ट्य वेगवेगळ्या ढंगात सादर करण्याची कला या दोघा कलाकारांनी लीलया साधली आहे. केवळ एक गादी आणि पाण्याचं दस्त या प्रॉपर्टीजवर , आवाज आणि शरीराच्या देहबोलीतून मुंबईच विश्वरुपदर्शन हे दोघे कलाकार घडवतात.
आता काही अधिकाच्या अपेक्षा : प्रयोगाची संहिता गोळीबंद आहेच पण त्यातील काही भागांवर थोडी कात्री चालवण हे इतर विषय घेण्याच्या दृष्टीने बर पडेल असं वाटत राहिलं . उदा . सुरुवातीचा प्राथनेचा भाग. तो जरा मिसमॅच वाटतो. त्याऐवजी मुंबईत विकसित झालेलं आयटी कल्चर , व्हाईट कॉलर टॉवर संस्कृती , गुज्जू, जैन यांचं मुंबईवर झालेलं सायलेंट "अतिक्रमण" , इथली चित्रपटसृष्टी , कॉस्मो संस्कृती, एकंदरीतच मुंबैची उपनगर यांची नोंद प्रयोगात घेतली गेली पाहिजे अस वाटत राहिलं.
मुंबै ही आंधळ्याच्या हत्तीसारखी आहे. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे तिचं वर्णन करतो. इतक्या दशकांचा इतिहास लाभलेल्या मुंबैच दर्शन दोन तासात घडवण अवघड आहे. पण या दोघांनी कलाकारांनी ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे. या प्रयोगाचं रूपांतर पूर्ण लांबीच्या नाटकात व्हावं ही इच्छा आहे. प्रेक्षकांनीही आता या वेगळ्या प्रयोगांना साथ द्यावी ही अपेक्षा.
या प्रयोगाना नेपथ्य वगैरेची भानगड नाही . घरी , सोसायटीत , ज्येनाच्या मंडळीत प्रयोग सहज सादर करता येतील .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा