आज मी आणि नवरा डिनर डेटला गेलेलो दुसऱ्या लग्नगाठवर्षपूर्ती निमित.
गेलो खरे पण मनात बाळ कधीही उठेल आणि पळत घरी लागेल ही भीती होतीच . त्यामुळे घराजवळ एक नवीन रेस्तरा ओपन झाले आहे तिथे गेलो . सुदैवाने चांगले निघाले ते होटल. मेन्यू आणि सर्विस छान होते .
दीड एक तासाने घरी गेलो तर बाळ नुकतेच उठलेले . ट्याव ट्याव. सुरू केलेली . वेळेत पोचलो म्हणून हुश्श केले .यापुढे बाळ पुरेसे मोठे होईपर्यंत कुठे एकटे जाता येणार नाही पूर्वीसारखे . गेले तरी अर्धा जीव घरी . खरेतर ज्या दिवशी प्रेग्नसी न्यूज कळलेली त्या दिवसापासूनच जबाबदारीला सुरुवात झालेली. डॉक्टरी चाचण्या , औषधे , दर दिवसाआड घेतली जाणारी इंजेक्शने, १५ दिवसांनी सोनोग्राफी करताना सगळे काही ठीक आहे ना वाली घालमेल या सगळ्यातून ९ महिने दिसमाजी वाढत गेलेला तो जीव जेव्हा हातात दिला गेला तेव्हा वाटल होत ते लिहिणे अवघड . ते काम डोळ्यातून येणाऱ्या पाण्याच . त्या अश्रूची सोबत आता जोडीला . बाळ शिकताना , मोठे होताना , मार्गी लागलेल पाहताना .
अश्या वेळी आई आठवली . आयुष्यभर कष्ट करून ती मात्र मार्गी लागलेल बघू शकली नाही . आई झाल्यानंतर आईची आठवण अधिक तीव्रतेने झाली . ती ही याच सगळ्यातून गेली असेल . भल्या मोठ्या घरात सासूच्या दमाखाली काम करत असताना , पोटातले मूल वाढत असताना हेच सगळ तिने अनुभवले असणार . तिच्याशी भांडताना , रुसवे फुटावे करताना , तिच्या अपेक्षाची पूर्ती न करता हवा तोच हेका चालवताना काय वाटले असेल तिला !
आई झाल्यावरच स्वतःची आई का कळते !
पालकत्व सुरू झाले आता …
०२ डिसेंबर २०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा