गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

सखुबत्ता

 मैत्रिणीने कोणे एके काळी तिची हिट रेस्पि पोस्ट करावी, ती आपण बघून आपल्या आवाक्यातील आहे असे म्हणून मनातल्या मनात मांडे खावेत. पण रेस्पिच्या घटक पदार्थच आणि चालू वर्तमानतील घटकांच प्रमाण जुळून येऊ नये . मग आपल्या कुकरच्या शिट्टीसारख्या उतू चाललेल्या उत्साहावर फसकन पाणी पसरावं. पण आपण पण  हार न मानता छोडेंगे नै जी म्हणत ती रेस्पि बुकमार्क करून ठेवावी. 

काही काळानंतर  आपल्याला रेसीपीचे घटक पदार्थ आणि चालू वर्तमानातील पदार्थ घरात आहेत आहेत याचा साक्षात्कार व्हावा आणि टीशर्ट खोचून सज्ज व्हा उठा उठा , सैन्य चालले पुढे करत स्वयंपाकघरात एन्ट्री मारावी आणि मग बऱ्याच दिवसांनी पेंडिंग असलेला सखुबत्ता एकदाचा करावा. 

तर मैत्रिणीची   रेसिपी पुढीलप्रमाणे : 

कैर्‍यांची सालं काढून पातळ काचर्‍या कराव्यात. सोलाण्याने काचर्‍या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. लोणचे मसाला नसेल तर लाल तिखटही चालेल . मी तेच घातलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्‍यांच्या काचर्‍या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी. तयार होतो गोड आंबट स्लर्प चवीचा अप्रतिम सखूबत्ता! 


रोजच्या भाजीचा कंटाळा आला असेल , रोजच्या डाळभाताबरोबर आणि खूप काही न करता स्लर्प चव हवी असेल तर ही रेसिपी करावी . नुसती बचकाभर अशीच संपते. भांड्याचा तळाचा खारही चविष्ट लागतो आणि चाटून पुसून भांड अगदी स्वच्छ होतं. 


हा मी केलेल्या सखूबत्ताच्या फोटो आणि माझ्या मैत्रिणीच नाव  Alpana Khandare



मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

गाजराची पचडी

गाजर हा सॅलडमधील एक प्रमुख घटक . पण नुसतं रोज रोज गाजराचे तुकडे चावयलाही कंटाळा येतोच. मग त्या गाजराच्या तुकड्यांना थोडासा ट्विस्ट द्यायचा . कसा ? तर गाजराची पचडी बनवून .
कृती सोपी आहे.
गाजराचे बारीक तुकडे अथवा कीस करून घ्यावा. छोट्याश्या कढईत एक चमचा तूप तापवून घ्याव. त्यात मिरची , जिर तडतडवून घ्यावेत . तडतड करत असतानाच गाजर टाकावं . त्यात चवीनुसार मीठ , साखर घालावं . आणि मग मंद आचेवर वाफवून घ्याव.
मात्र अगदीच दणदणीत वाफ वगैरे काढायची नाही . फारतर अर्धा मिनिट . गाजर तस लगेच शिजत.
फारच लाड करायचे असतील तर खोबरं , कोथिंबीर घालून सजवू शकता अथवा लिंबाच्या रसाची ऍडीशन देखील चव खुलवू शकते .
पण शेवटी हे सॅलड आहे ध्यान्यात असू द्यावे
तर आज डब्यात असलेली गाजराची पचडी .
याच पद्धतीने काकडी, मुळा यांचीही पचडी करता येऊ शकेल असे वाटते .

रेसिपी सौजन्य - मायबोली साईटवरील माहिती 




लहान मुलीची लहान पोळी

 आज पोळ्या करण्याऱ्या काकूंनी ही गंमत केली आणि ते न सांगता. !.जेवायला बसत असताना पोळ्यांचा डबा उघडला आणि एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आलं ..

लहानपणी आई आणि आजी माझ्यासाठी मुद्दाम लहान मुलीची लहान पोळी बनवत असतं . त्यामागे मी आकर्षण वाटून नीट खाईन असा हेतू असायचा . "फक्त तुझ्यासाठी केलेय बरं का " ही फोडणी असायची .आपल्यासाठी स्पेशल केलेय या फिलिंगने इतरांना तु क देत मी ही खात असे.. आता ते सारं आठवून हसू येतेय.
अजून एक म्हणजे भातुकली खेळत असताना प्रत्येकाने काहीतरी घेऊन यायचं असा अलिखित नियम असे . आजी तेव्हा मला कुरमुरे , फुटाणे किंवा ही छोटी पोळी तयार असेल तर देत असे. मज्जा यायची तेव्हा . सगळे आपलं आपलं घेऊन यायचे आणि एकदम काला सदृश्य काहीतरी तयार व्हायचं . पण ते सगळेजण मिटक्या मारत खायचो.
तर पोळीचा आकार बघून "अरें ! आपण इतके मोठे झालोय तर " असं फिलिंग देणारी ही छोट्या मुलांची छोटी पोळी..

This small roti was prepared by our maid today and same gave me nostalgic feelings.
My mother and Grandma used to prepare this little roti for me. Their Additional graft was "we prepared this only for you and NOT for anyone" . The only aim of theirs was to made me eat . I also enjoyed the process with the feeling of superlative.
Further in childhood , we used to play "Bhatukali " or playing house . The unwritten rule of Game was that everyone contribute something. My Grandma used to fund me murmura , chana or this little roti. Such a Crazy thing !!!
So here is small little roti which give me feeling that " oh ! Now I am so grown up...



पेज / खिमाट

पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .

मला मात्र पेज /खिमाट हे नेहमी आजारी असतानाच पदार्थ वाटत आलाय . आजारी पडल्यावर तोंडाची चव गेली की आई /आजी हमखास पेज करतात . त्या बरोबर किंचित लोणच्याच्या खार . गेलेली चव परत यायची गॅरेटी. कधी कधी तर खास पेज पिण्यासाठी आजारी पडावं अस वाटत . करायलाही अगदी सोपा असं . मात्र पेजेची खास चव येण्यासाठी तांदूळ मात्र गावचेच हवेत . एक वाटी तांदुळला 5 ते 7 वाट्या पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ . ते आटून आटून एका पातळीला आलं की झाली पेज तयार .खिमाटसाठी अजून थोडं पाणी आटवायचं . एवढं सगळं झालं की वाडगाभर पेज ओरपायची .हो !ओरपायचीच .पेज /खिमाट काही नुसतं खायचा पदार्थ नाही . तो ओरपायचाच असतो .. वाडगा भरून पेज /खिमाट खाल्लं की दुपारपर्यतच्या वेळेची निश्चिती .

कारण नक्की काय ते माहीत नाही पण पेज /खिमाट शनिवारी करायची नाही असा दंडक आहे म्हणे आणि आई तो पाळते .त्यामुळे शनिवारी पेजेला बिग नो . घरी आम्ही आळशीपणा करत असलो आणि आजी कधी वैतागली तर तिच्या तोंडून 'वेळेला पेज आणि निजेला शेज ' असा शेरा हमखास बाहेर पडायचा . गंमत वाटायची तेव्हा ..
पेजेच थोडं नकारात्मक वर्णनही ऐकलं आहे . नुसत्या पेजेवर एखाद्याने दिवस काढले अस आजी कधी कधी जुन्या आठवणी सांगताना म्हणायची. ते सांगताना गळा दाटून आलेला असायचा तिचा . मधु मंगेश कर्णिकांच्या पुस्तकातही पेजेचा उल्लेख वाचलाय. एकंदरीतच पेज /खिमाट आणि कोकण यांचं नातं अतूट आहे .
तर आता वरील पेज/खिमाट पुराण ऐकल्यावर हा फोटो !



रविवार, ४ एप्रिल, २०२१

साडीची गोष्ट !!!

 माझ्या लहानपणी माझी आई ऑफिसात साड्याच नेसून जायची. मध्यमवर्गात त्या काळात सलवार सूट घालणे म्हणजे क्रांती . त्यातूनही सरकारी हापिसात ड्रेस घालणे म्हणजे contempt of court. मला आठवतंय मी एका कामानिमित्त अंधेरीत असलेल्या सीमाशुल्क ऑफिसात जीन्स घालून गेले होते. खरंतर मुद्दाम अस काही केलं नव्हतं. त्यावेळी खरंतर लक्षात आलं नाही आणि कामाच्या घाईत  तेवढा वेळही नव्हता. तर तिथल्या सरकारी बाबूंनी कुठला परग्रहावरील माणूस इथे आला असा लूक दिलेला. (माझं लहानपण ते उच्चशिक्षण होऊन य वर्ष लोटली तरीही . तर त्या अश्या सगळ्या प्रकारांमुळे कितीही वेळ झाला तरी आई साडीच नेसायची. आता साडी नेसण म्हणजे वेळखाऊ काम. परकर , ब्लाउज , पिन वगैरे सगळं रेडी ठेवावं लागतं. त्यात माझी आई म्हणजे एकदम भारी काम . साडी नीटच व्यवस्थित नेसली पाहिजे असा तिचा बाणा. सकाळची स्वयंपाक त्यात हे साडी प्रकरण. त्यामुळे ती लवकर उठून सगळं करायची. तिची ती सगळी लगबग गडबड बघून मला  साडी या प्रकाराबद्दल फारसं ममत्व नव्हतं. सकाळच सगळं करून, साडी नेसून  ठरलेली ९.१५ ची ट्रेन गाठणं हे तीच रुटीन. तर मला एवढ्या सकाळच्या घाईत तिची साडी नेसायचीच जबरदस्ती काही झेपायची नाही. पण त्याच्या मागच कारण मला नंतर कळलं जे वर लिहिलं आहेच. माझ्या आईला साडी ते सलवार सूट अस ट्रान्सफॉर्मेशन करायला माझं सीएस पूर्ण व्हावं लागलं. ते ही तिला खूप कंव्हीस केल्यावरच.

माझा स्वभाव घोळ घालत बसायचा नाही. मला सुटसुटीत कपडे अधिक आवडतात.कॉलेजमध्येही साडी डे असायचा तेव्हा मी  सलवार सूट घालून गेलेले. मैत्रिणींनी लावलेले बोल देखील चूपचापपणे ऐकून घेतलेले. ह्यात माझ्या कम्फर्टनेसचा भाग अधिक होता. 
खरंतर कामानिमित्त अनेक महिला आयएसएस ऑफिसरना /  कॉर्पोरेट सीईओना साडीत पाहिलेलं  आहे. उदाहरणार्थ मनीषा म्हैसकर, चंदा कोचर. या पॉवर वुमन ज्याप्रकारे ग्रेसफुली त्या साड्या नेसतात ते मला आवडतं. त्यात साडीचा रंग , चॉईस , accessories बरोबरच त्या पदाचा swag ही असतो. आणि मग मला मोह होतो साडी नेसायचा. पण साडी नेसायची म्हटली की आईची लगबग समोर यायची आणि मग माझा कॉन्फिडन्स हरवून जायचा. 
तर मग कॉलेजात टाळलं तरीही ऑफिसतले साडी डेज काही चुकले नाहीत. तिथे एच आर नावाचा प्राणी आणि टीम बिल्डिंग नावाचं पॅकेज अपरिहार्य असतं. तिथे कारणं चालत नाहीत. मग नवीन ऑफिस जॉईन केल्यावर एचआरचा दिवाळीनिमित्त इमेल आला ट्रेडिंशनल डे साजरा करायचा. मग काय ! आईकडे तिची साडी मागितली. पण तिने जीन्स , टॉप वगैरेची खरेदी पुरे झाली , आता जरा साड्याकडे बघ या निमित्ताने अस सुचवलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी आणि आई साडी खरेदीस गेलो. तिथल्या साड्यांचे एक एक प्रकार बघून माझी अवस्था घेशील किती दोन कराने अशी झाली. माहेश्वरी , नारायणपेठ, पैठणी , सिल्क , चंदेरी, खादी,जमदानी  अश्या कितीतरी प्रकारच्या साड्या !!! 
एक दोन साड्या दाखवून होताच दुकानदारला माझे साड्याविषयक प्रगाढ ज्ञान " अंकल , वो साडी मुझे फिट नहीं होगी प्रॉपर" या कमेण्टवरून लक्षात आले असावे , त्यामुळे माझ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायच्या भानगडीत न पडता त्याने इथे बॉस कोण आहे ते ओळखले आणि आई सांगेल ती साडी दाखवायचे सुरू केले. बरीच भवती न भवती केल्यावर अखेरीस निळी साडी  आईच्या आणि माझ्या पसंतीस आली. साडी खरेदी तर झाली , आता पुढची पायरी म्हणजे ब्लॉउज आणि इतर खरेदी. या प्रकाराने चांगलेच दमवले. परकरची योग्य शेड शोधण्यापासून ते टेलरला कश्या प्रकारचे ब्लॉउज हवे आणि त्याची डिलिव्हरी कधी देणार यापूर्ण प्रकारावर मातोश्रीनी चांगलेच बौद्धिक घेतले. दोनेक तास तरी त्या मार्केटमध्ये फिरत होतो. बरं हे सगळं झाल्यावर साडी नेसवणार कोण ही समस्या. माझ्या आईला काही हे जमत नव्हतं. मग आमच्या स्वयंपाकाच्या काकू धावून आल्या. त्यांनी साडी नेसायला मदत केली चांगल्या 4 ते 5 पिना लावून. त्यातही मध्येच साडी सुटली तर काय करायचे ह्यावर मोठं लेक्चर झोडल.एवढे सगळे सव्यापसव्य झाल्यावर प्रत्यक्ष ऑफिसात जायची वेळ आली तेव्हा पंचाईत झाली. ट्रेनने काही मला जमणार नाही अस जाहीर केलं तेव्हा मातोश्रीनी काय ह्या आजकालच्या मुली असा तुच्छ कटाक्ष टाकला आणि रिक्षेची सोय केली. ऑफिसात गेल्यावर तिथे वेगळंच वातावरण ! जेन्ट्स पुरुष कुर्त्यात एकदम एन्जॉय करत होते , काही सराईत लेडीज बाया साडी नेसून मस्त वावरत होत्या. आमच्यासारख्या पहिलटकरीण एकदम अवघडून गेलेल्या. बरं! ट्रॅडिशनल डे होता म्हणून एच आरने कामात सूट दिली नव्हती. काम होतच. आणि अश्यावेळी नेमकं ते अर्जंट असत. त्यामुळे ते एक टेन्शन. साडीची सवय  नसल्याने माझ्या सहकारीणीला मला टेन्शन आलेय साडीचे  म्हणून १० वेळा सांगितलं तेव्हा तिने वैतागून तू. क. दिला आणि आता लंचपर्यत अजिबात खुर्चीतून उठू नकोस अस बजावलं. निमूटपणे ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. पण लंचपर्यत मी जरा सैलवलेले आणि थोडं रिलॅक्स पण वाटू लागलेल. त्यामुळे लंचनंतर फोटोसेशन करून धमाल केेली. बॉसनेही मूड बघून कामाची खळखळ केली नाही. दिवस संपला, घरी परतताना रिक्षाच केली. कधी एकदा साडी सोडून रिलॅक्स होतेय अस झालेलं.फरफरा साडी सोडून , पिन अप काढून मोकळा श्वास घेतला.
 हे सगळं बघून मातेने कठीण आहे असा लूक दिला आणि आम्ही कश्या जायचो ऑफिसात , या मुलींना काहीच जमत नाही असा शेरा मारला. तर तुसी ग्रेट हो माँ  हा रिप्लाय देऊन चहा दे ना ची गळ घातली

तर अशी ही माझ्या साडी नेसण  या प्रकाराची गोष्ट. पुढच्या वर्षीच्या ट्रेडिंशनल डेला ही हाच एपिसोड थोड्याफार फरकाने रिपीट झाला. पण तेव्हा अनुभव असल्याने इतकं काही वाटलं नाही. आतातर  साडी नेसायची तर काय करावं लागतं आणि  नेसल्यावर काय करायचं असत याची  कल्पना आलेली आहे. पण आजही साडी नेसायची म्हटलं की ओह असा मनाशी येतच  आणि टेन्शन येतच.  पण कधीमधी ट्राय करायला हरकत नाही , वर्षातून किमान तीन वेळा तरी साडी नेसायचीच अस ठरवलं आहे  प्रॅक्टिस सुटू नये म्हणून . आता आई हयात नाही मार्गदर्शन करायला पण जमेल आणि जमवणारच आहे. 

कही कही से

 "हाय दोस्तो , वेलकम टू ९२.५ म्युझिक एफ एम. मैं हु आपकी दोस्त शिरीन ! शिरीन द ग्रेट. व्हॉट अ वंडरफुल डे ! क्या मौसम है , क्या नजारा है . तो चलो इसी बात पे we are now move further part of our favorite show . जैसे की आप सब लोग जानते है की शो का नाम है "आपकी पसंद " तो चलो चलते है नेक्स्ट कॉलर की रिक्वेस्ट की और. जो की सुनना चाहते है ये ब्युटीफुल गाना . आय एम शुअर आपको भी ये गाना पसंद आयेगा . So enjoy and keep listening. 

                                    कहीं-कहीं से हर चेहरा तुम जैसा लगता है
                                    तुम को भूल न पायेंगे हम, ऐसा लगता है

ट्रेन सटासट धावत होती. झाडामागून झाडे, घरामागून घरे मागे पडत होती. अश्यातच कोण्याच्या तरी हलवण्यामुळे विशालला जाग आली. डोळे चोळत त्याने समोर पाहिलं तर समोरचे निळे डोळे त्याला जाग करत होते.
" अंकल , प्लिज मुझे विंडो सीट चाहीये.क्या आप मुझे बैठने देंगे ? मेरे सीटपर बैठेये. प्लिज !!!"
निळाई आर्जव करत होती. विशालने नजरेला नजर भिडवली. त्या नजरेत तो बघता बघता डुंबून गेला. 
सानिका ! पहिल्यांदा कुठे भेटली बरं. हा कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये. तिचा ग्रुप तेव्हा परफॉर्म करत होता. ग्रूपची कोओरडीनेटर म्हणून सगळी काम अगदी कमी तिथे आम्ही कामही पार पाडत होती. आपण मात्र या गोष्टीपासून लांब होतो. पहिल्यापासून आर्मीच आकर्षण होतं आणि तेच वेड डोक्यात घेतलेलं. अमितने ओढत नेलं म्हणून गॅदरिंगला गेलो आणि तिथेच सानिकाशी ओळख झाली.  आयत्या वेळेस कोरस चमूतील एक जण कमी पडला आणि मी ते काम करावं म्हणून तिने आर्जव सुरू केलं. अगदी ही समोरची निळाई करतेय तसच. पहिल्यांदा  सानिकाला बघितलं तेव्हा काय बरं आवडलेलं आपल्याला ?  तिचे डोळे!  ते शांत  निळेशार गर्द डोहासारखे . अगदीच खेचून घेतलं त्यांनी. मग पुढील सिलसिला.
आता ५ वर्षांनी जातोय  परत ते त्यांच्यासाठीच. आजही तसेच आहेत . शांतवून घेणारे. न बोलता ५ वर्षे वाट पाहणारे. 
"अंकल , प्लिज मुझे सीट दोगे ? " विशाल भानावर आला. समोरच्या प्रश्नाकीत पण शांतपणे आर्जव करत असलेल्या निळाईकडे त्याने पाहून घेतलं आणि स्वतःशीच हसला तो...

                                           ऐसा भी इक रंग है जो करता है बातें भी
                                           जो भी इसको पहन ले वो अपना-सा लगता है


`````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````

                                        और तो सब कुछ ठीक है लेकिन कभी-कभी यूँ ही
                                         चलता-फिरता शहर अचानक तनहा लगता है


घड्याळन टोले देताच प्रो. डिसोझा भानावर आले. "अरे आज कुमारकडे जायला हवं , त्याने आग्रहाने बोलावलं आहे. २५ वी अनिव्हर्सरी आहे त्याच्या लग्नाची. जायला तर लागेलच" ते स्वतःशीच पुटपुटत राहिले. 'काय गिफ्ट द्यायला हवं बरं! आपण असेच वेंधळे. नॅन्सी असायला हवी होती,  तिने काहीतरी मार्ग काढला असता. याबाबतीत तिचं खरी हुशार. जगविख्यात शास्त्रज्ञ असून फुकट आपण असे ती गमतीने म्हणायची तेच खरं. हे सगळं सांभाळून घेतलेलं ,सजवलेलं  मोठं घर ही तिची धडपड. आपण आपल्याच प्रयोग विश्वात रममाण सगळं काही तिच्यावर सोपवून. अगदी विल्सनझाल्यावरही ! 
ती गेल्यावर मात्र आपण उघडे पडलो. विल्सनपेक्षाही पोरके झालो. नॅन्सीची गरज तेव्हा तीव्रतेने जाणवली. अस का होतं? माणूस जवळ असतो तेव्हा गृहीत धरलं जातं आणि गेल्यावरच त्याची किंमत कळते. एवढे शोध लावलेले पण तिचा कॅन्सरही काही वेळेवर शोधू शकलो नाही. पाहता पाहता निघून गेली. वाळूसारखी निसटून. त्यानंतर हे असेच होतेय. सैरभैरसारखं. विल्सन सगळी व्यवस्था लावून गेलाय पण नाही जमतंय आता . आज सीमेट्रीत जायलाच हवं. त्याशिवाय बरं वाटणार नाही.
डिसोझानी हळूच ओलसर झालेला चष्मा पुसला. ड्रायव्हरला हाक मारून गाडी काढायला सांगितली .

```````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
"गौरव चल ! स्कुलबस आलीये, उशीर होईल"  शलाकाची गडबड चालूच होती. दर सकाळचा हा कार्यक्रम होता. शेखरची तिच्या नवऱ्याची तयारी, गौरवची धांदल यातच तिची सकाळ संपे. आताही तेच झालं. गौरवला गेटपाशी सोडून ती परत आली तर पुन्हा तो भास झाला. 
आताशा हे फार होऊ लागलंय. चित्त थऱ्यावर ठेवायलाच हवं. काय होतंय हे! अस मनोमन पुटपुटतच ती आत आली. एक चिमटा काढून बघितला स्वतःलाच आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर टाकली तर हो! तोच होता . अभिजित.. फोनवर बोलत असलेला. गाडीला सिग्नल मिळायची वाट पाहत.

"हा !इथे कसा ? कसा काय पोचला. माहितेय का त्याला मी इथे राहते ते ? सगळं मागे ठेवून आलोय की आपण इथे १० वर्षांपूर्वी . आता परत ते सगळं!!! " शलाकाने डोळे घट्ट मिटून घेतले..

अभिजित आणि शलाका . कॉलेजमध्ये फेमस लव्हबर्ड कपल. आख्या गृपने त्यांना मनोमन वॉकओव्हर दिलेला दोघांचंही शिक्षण पूर्ण होताच घरी सांगायच ठरलेलं. आणि झालेही तसेच. पण इथेही " पण" आलाच. शलाकाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. जाती वेगळ्या असल्याने. खूप वादावादी , भांडण , रुसवे फुगवे झाले. पण मान तुकवावीच लागली तिला वडिलांसमोर. 
शेवटचा निरोप घेतानाच अभिजीतचा दुखरा चेहरा तिला आताही जश्याच्या तसा आठवला. ओढलेला, प्रचंड वेदना असलेला. नजरेला नजर भिडवायची तिची हिंमत नव्हतीच. कसेतरी करून निरोप घेतला पण मग तो चेहरा सतत पाठलाग करत राहिला का अस करतेस म्हणून काकुळतीने प्रश्न विचारणारा. इतकी वर्षे झाली पण तो चेहरा अजूनही जश्याच्या तसा आठवतोय ! काय करू मी ? शलाकाने डोळे पुसले. 

                                            "अब भी यूँ मिलते हैं हमसे फूल चमेली के
                                             जैसे इनसे अपना कोई रिश्ता लगता है"

                                             तुम क्या बिछड़े भूल गये रिश्तों की शराफ़त हम
                                             जो भी मिलता है कुछ दिन ही अच्छा लगता है


कुठेतरी रेडिओवर निदा  फाजलींच  गाणं वाजत होतं...

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...