पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .
मला मात्र पेज /खिमाट हे नेहमी आजारी असतानाच पदार्थ वाटत आलाय . आजारी पडल्यावर तोंडाची चव गेली की आई /आजी हमखास पेज करतात . त्या बरोबर किंचित लोणच्याच्या खार . गेलेली चव परत यायची गॅरेटी. कधी कधी तर खास पेज पिण्यासाठी आजारी पडावं अस वाटत . करायलाही अगदी सोपा असं . मात्र पेजेची खास चव येण्यासाठी तांदूळ मात्र गावचेच हवेत . एक वाटी तांदुळला 5 ते 7 वाट्या पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ . ते आटून आटून एका पातळीला आलं की झाली पेज तयार .खिमाटसाठी अजून थोडं पाणी आटवायचं . एवढं सगळं झालं की वाडगाभर पेज ओरपायची .हो !ओरपायचीच .पेज /खिमाट काही नुसतं खायचा पदार्थ नाही . तो ओरपायचाच असतो .. वाडगा भरून पेज /खिमाट खाल्लं की दुपारपर्यतच्या वेळेची निश्चिती .
कारण नक्की काय ते माहीत नाही पण पेज /खिमाट शनिवारी करायची नाही असा दंडक आहे म्हणे आणि आई तो पाळते .त्यामुळे शनिवारी पेजेला बिग नो . घरी आम्ही आळशीपणा करत असलो आणि आजी कधी वैतागली तर तिच्या तोंडून 'वेळेला पेज आणि निजेला शेज ' असा शेरा हमखास बाहेर पडायचा . गंमत वाटायची तेव्हा ..
पेजेच थोडं नकारात्मक वर्णनही ऐकलं आहे . नुसत्या पेजेवर एखाद्याने दिवस काढले अस आजी कधी कधी जुन्या आठवणी सांगताना म्हणायची. ते सांगताना गळा दाटून आलेला असायचा तिचा . मधु मंगेश कर्णिकांच्या पुस्तकातही पेजेचा उल्लेख वाचलाय. एकंदरीतच पेज /खिमाट आणि कोकण यांचं नातं अतूट आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा