ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागलो .  वर्ष झालं .नंतर काँग्रेसच्या लोकांचे भाषण ऐकले. ते ऐकून आम्ही मुलांनी नाना चौकात जाऊन भारतमाता की जय बोललो . गांधीबाबा भारी होता . सभेत जाऊन भाषण ऐकायचो . मिलच काम कापसावर चालायचं . मग १९४७ साली इंग्रज निघून गेले . तेव्हा नाना चौकात मोठा जुलूस झाला . सगळीकडे दिवे लागले . पेढे वाटले. मिलच्या जॉबरने सांगितले तुम्हाला सुट्टी . मग आम्ही पोरे फिरायला निघालो. सगळीकडे आनंद होता. लोक खुश होते. काँग्रेसच्या लोकांनी आता आपले राज्य आले असे सांगितले . सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . भारतमाता की जय म्हटले . नेहरू मंत्री झाला . त्यांच्यानंतर इंदिरा . 

=========================================


माझ्या ९१ वर्षाच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले. एकदा कौटुंबिक समारंभात विषय निघाला असता त्यांनी या आठवणी सांगितलेल्या . तब्येत बरी होती तेव्हा वयपरत्वे जेवढं त्यांना लक्षात होत त्यांनी सांगितलं . त्यामुळे थोडेसे विस्कळीत आहे . हे सगळं तेव्हा अचंबित होऊन लक्षात राहिलेलं . आजच्या दिवशी हे सगळं इथे सांगावसं वाटलं 😊

बुधवार, १४ मे, २०२५

रिचार्ज

 आणि मग एके क्षणी मेंदूने तसेच डोळ्यांनीही शिणवटा आल्याचा निर्वाणीचा इशारा द्यावा . स्क्रीनवरच्या घड्याळ्याकडे पाहून चॅक आवाज काढत आवाराआवर करावी. 24 अवर्स सेन्टरलाईज्ड एसी ऑफिसच्या लिफ्टमध्ये शिरावं. मध्येच भेटलेल्या ऑफिसबडीजच्या " ओ !  लिटिल अर्ली लिव्हिंग टुडे ? " खोचक प्रश्नाला हॅ हॅ हॅ करत " सडनली , आय चेंज माय प्लॅन टू होम टुडे " असं कूल (!) उत्तर द्यावं. लोकलच्या प्लॅटफॉर्मवर पोचताच शिंग फुंकले रणी पवित्रा घ्यावा आणि तितक्याच उत्साहाने सज्ज होऊन लोकलमध्ये घुसावं. त्या झटापटीत आपल्या पायावर भरभक्क्म पाय पडलेला असतो त्यामुळे पाय हुळहुळत असतो  , आपला धक्का इतरांना लागलेला असतो,  बॅकग्राउंडला तू तू मैं मैं संगीत वाजत असत . तर या सगळ्याकडे सवयीच्या निर्ढावल्याप्रमाणे (!) दुर्लक्ष करावं. मग  आपलं स्टेशन येताच आपसूक उतरलं जाण्याची खात्री करून घेऊन उतरावं.  

स्टेशन येताच आज रिक्षा करावी कि चालत जावं या द्विधा मनस्थितीत सापडण्याच्या शक्यतेच्या आत काल परवाच झालेलं हेल्थ सेमिनार आठवावं आणि त्यातल यू मस्ट वॉक अटलिस्ट फॉर 45 मिनिट्स चा बुलेट स्मरणात येऊन पायी हळू हळू चालाची वाट पकडावी. चला थोडाफार तरी व्यायाम होतोय या कल्पनेने खुश व्हावं.  घर ते स्टेशन या 15 मिनिटात सगळे विचार अनविंड करायचा प्रयत्न करावा पण सकाळपासूनचा स्ट्रेस घेत चालत राहावं . 


सोसायटी येताच आपलं बॅडलक आज खूप खराब आहे हे पक्के केल्यासारखी लिफ्ट आपण बटन दाबायच्या आता टॉप फ्लोर दिशेने धावत सुटलेली असते . अश्या वेळी चरफडण या प्रतिक्षिप्त क्रियेने आधीच असलेल्या ताणात भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कुठल्यातरी ऑनलाइन पोर्टलवर वाचलेल्या आर्टिकल मधले 1, 2, 3,4 असे आकडे मोजावेत. शक्यतो चेहरा हसरा ठेवावा आणि घरी पोचाव . 


मग सेफ्टी डोअर वर अक्षरशः रेलून बेल वाजवावी. दिवसभराच्या साचलेल्या  ताणाच थोडा अंश हाताकडे परिवहन झाल्याने बेलचा आवाज अंमळ थोडा जास्त होतो. त्याबद्दल  दोन शब्द ऐकायचीही तयारी ठेवावी. 


दरवाजा उघडल्यावर थकलेल्या दिवसाचं रिचार्ज आपली वाट पाहत असत. दारातून आत येऊन चप्पल काढत असतानाच समोरनच हैय्या असा मोठा आवाज येतो तो चेहऱ्यावरील बोळक्या हास्यासकट.. आपल स्वतःच मिनी व्हर्जन आपली वाट बघत असत. त्या चिमुकल्या मोठ्या डोळ्यात आई आलीये असे जिंकण्याचे हसरे भाव असतात. 


मग आपलेही ओठ हसू लागतात, दमलेले डोळे फ्रेश होतात , आणि आपसूकच हात त्या पिलाचा पापा घ्यायला सरसावतात…सकाळपासूनचा ताण एका क्षणात विसरल्याच फिलिंग मग आपसूक येऊन जातं. 


सुख म्हणजे नेमकं तरी दुसरं काय असत !!!

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

का रे ऐसी माया !

 आज मी आणि नवरा डिनर डेटला गेलेलो दुसऱ्या लग्नगाठवर्षपूर्ती निमित. 

गेलो खरे पण मनात बाळ कधीही उठेल आणि पळत घरी लागेल ही भीती होतीच . त्यामुळे घराजवळ एक नवीन रेस्तरा ओपन झाले आहे तिथे गेलो . सुदैवाने चांगले निघाले ते होटल. मेन्यू आणि सर्विस छान होते .

दीड एक तासाने घरी गेलो तर बाळ नुकतेच उठलेले . ट्याव ट्याव. सुरू केलेली . वेळेत पोचलो म्हणून हुश्श केले .

यापुढे बाळ पुरेसे मोठे होईपर्यंत कुठे एकटे जाता येणार नाही पूर्वीसारखे . गेले तरी अर्धा जीव घरी . खरेतर ज्या दिवशी प्रेग्नसी न्यूज कळलेली त्या दिवसापासूनच जबाबदारीला सुरुवात झालेली. डॉक्टरी चाचण्या , औषधे , दर दिवसाआड घेतली जाणारी इंजेक्शने, १५ दिवसांनी सोनोग्राफी करताना सगळे काही ठीक आहे ना वाली घालमेल या सगळ्यातून ९ महिने दिसमाजी वाढत गेलेला तो जीव जेव्हा हातात दिला गेला तेव्हा वाटल होत ते लिहिणे अवघड . ते काम डोळ्यातून येणाऱ्या पाण्याच . त्या अश्रूची सोबत आता जोडीला . बाळ शिकताना , मोठे होताना , मार्गी लागलेल पाहताना . 

अश्या वेळी आई आठवली . आयुष्यभर कष्ट करून ती मात्र मार्गी लागलेल बघू शकली नाही . आई झाल्यानंतर आईची आठवण अधिक तीव्रतेने झाली . ती ही याच सगळ्यातून गेली असेल . भल्या मोठ्या घरात सासूच्या दमाखाली काम करत असताना , पोटातले मूल वाढत असताना हेच सगळ तिने अनुभवले असणार . तिच्याशी भांडताना , रुसवे फुटावे करताना , तिच्या  अपेक्षाची पूर्ती न करता हवा तोच हेका चालवताना काय वाटले असेल तिला ! 

आई झाल्यावरच  स्वतःची आई का कळते ! 
पालकत्व सुरू झाले आता … 

०२ डिसेंबर २०२४ 

शनिवार, २२ जुलै, २०२३

कविता बिविता

 एकेकाळी मी कविता लिहिलेली.

कपाट आवरताना रुपारेलची आठवण मिळाली. तर झालं अस की रूपारेल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं लिखाण असलेलं imprint नावाचं वार्षिक मॅगझीन निघत. रूपारेल मध्ये विज्ञान, वाणिज्य, कला अश्या तिन्ही शाखा आहेत. यापैकी विज्ञान आणि कला शाखेची मुलं या मॅगझीनमध्ये लिहायची. कॉमर्सवाले मात्र या सगळ्यापासून दूर. 

तर हे काही नव्याने रुजू झालेल्या अकाउंट्सच्या सराना पटेना. Student लोकांचा सर्वागीण विकास (!) व्हायला हवा ह्या मोदीजी विचारांचे ते पाईक. या उद्दात भावनेने त्यांनी  नियमितपणे लेक्चर्स अटेंड करण्याऱ्या मुलांच्या पाठी त्यांनी काहितरी लिहा रे असा धोशा लावायला सुरूवात केली. पण मास्तरांनी सांगितलं की त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं हे व्रत आचरणात आणत असल्याने आम्ही लोकांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ही पोरटी ऐकत नाहीसे पाहून मास्तरांनी त्यांचं एक्स्ट्रा क्लास घेण्याचं ब्रह्मास्त्र बाहेर काढल. ही मात्रा बरोबर लागू पडली आणि खालील कविता प्रसवली गेली ती देखील त्यांच्याच तासाला मागील बेंचवर बसून. खरतर कॉलेजच्या वार्षिकात आपल नाव बघून गुदगुल्या झाल्या होताच. खोटं का बोला ! पुढचे १० दिवस नातेवाईक, मित्र मैत्रिणीत मिरवण्यात गेलेले. 

मिरवून झाल्यानंतर मॅगझीन अडगळीत पडल आणि नवकवयित्रीचा बहरही. (श्या! म्हातारं झाल्याचं फिलिंग आल) . इतक्या दिवसांनी आज सापडलं आणि तेव्हाच लिहिलेलं हे लिखाण बघून आता हसायला आलं.




सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

सरता काळ

 लहानपणी डॅशिंग म्हणून पाहिलेली माणसं मोठेपणी भेटतात तेव्हा ती म्हातारी झालेली असतात. निसर्गनियम मान्य करूनही त्यांचं म्हातारंपण बघवत नाही. एकेकाळी तडफेने चालणारे हात, डोळे मंद होतात. विझत जाण्याऱ्या ज्योतिच प्रतिबिंब त्यात दिसतं. तैलबुद्धी असलेला माणूस स्मरणशक्तीच्या हळूहळू होत जाणाऱ्या ऱ्हासाने हतबल झालेला दिसतो. गात्र थकलेली दिसतात. इथे आपल्या मनात कालवाकालव. इतक्यात कस कोणी म्हातारं झालं? किती काळ लोटला ? एक दिवस देणाऱ्याचे हात आपल्या हातात सुरकतून येतात. अनिश्चितपणा वगैरे सगळं मान्य करूनही ती संध्याछाया घाबरवून जाते. सगळं चक्र उलट फिरवावे अस मनात येत पण ते होऊ शकत नाही. मग उरते ती कासाविसता आणि आपणही त्या मार्गावर पाऊल टाकतोय ती जाणीव. अशावेळी आवंढा गिळताही येत नाही आणि बोलताही येत नाही. मूकपणे समोर असलेल्या गात्राचे शब्द ऐकावेत, लहानपणीचा मनात असलेला काळ पुन्हा जिवंत करावा एवढंच उरतं. पुलंच्या त्या दोन वस्तादाना पण तसच वाटत असेल काय ?

सोमवार, १८ जुलै, २०२२

My Costly Affair

 My Costly Affair


“What’s in a name? That which we call a rose. By any other word would smell as sweet.“ William 

Shakespeare wrote in famous ‘Romeo and Juliet’. 

Well Well, though calling rose a sunflower does not diminish its smell, but it does cost heavily if 

someone pronounces your name weirdly. 

So the incident happened during my flight from Delhi to Mumbai. It was an Indigo airlines. 

Everything was under control. At least at that point! Yes! I didn’t forget my ticket, took printed 

copies , my small backpack was properly packed, reached airport well before time to avoid Delhi 

traffic and completed all security checks . Then ticked all points correctly in my checklist as 

everything was OK. What a relief! It was a bright sunny day of March. So there was no sign of 

weather disturbance. As a practice, I got my tickets stamped. Since there was much more time left 

for the flight, I decided to roam around through Beautiful Indira Gandhi Airport. Indeed! The airport 

is beautiful. 

After sometime, I got bored of roaming. Hence I decided to read a book. I just glanced my watch. 

Well there was still time for flight. And yes, all was well by that time. 

Time had passed. I received phone call by mum. She called me to check whether I boarded my flight. 

Suddenly I felt of waking up and murmured myself about flight. I checked wristwatch and astonished 

that why the announcement was not made about flight. I rushed to ticket counter and asked 

attendant whether the flight was delay or some problem occurred? 

I felt that my heart pumped at the supersonic speed by hearing her answer. Yeah! The Answer was 

“THAT FLIGHT HAD TAKEN OFF!”

 

Oh my god! How is it possible? I just got feared and felt helpless. 


I  became worried. Having some angry tone in my voice, I asked her “Madam, did you announce my 

name before allowing flight to take off?“ She plainly said “Yes, Madam. We have announced your 

name thrice. There was no response from your side.” Again I got surprised and told her that I have 

never heard that my name is being announced. But she was stuck to her point firmly. On other side, I 

was damn sure that I hadn’t heard announcement. We, both defending our points consistently. 

And suddenly I realised something. Something that I had faced many times. Yeah! It was my name. 

They announced my name but in a very bizarre manner. I got clue from attendant’s intonation. She 

was pronouncing my name in an incorrect way. I had faced different version of my name till now and 

I was used to it. People utter/write my name as per their convenience. It can be anything 

“zhai”/”Jae”/”jayee”/Zai”/Jaiee” to name a few. And I understand it only to feel pity on myself. 

But this time, it was different. They called my name in such a wrong way that I myself couldn’t 

understand that my name was being announced. Hence, in this way, my missed my flight. How 

helpless I felt that day! No one to blame, No one on whom I could be angry. Since there was no use 

of arguing with attendant, only option was to book another flight. I followed rituals, boarded next 

flight and reached Mumbai by paying return journey fare for single trip. How Costly affair it was! 

So I learned 2 lessons in whole Incident. 1. Never read book while waiting. 2. Pay extra attention to 

announcement. Huh! I will never forget that incident. 

If Shakespeare would have lived today, I would have narrated him above incident and told him that I 

strongly object to “what’s in name”. I am sure, he would have agreed to change his statement to 

“Yes, All is in name”.


P.S. - I got a prize for this write up in writing competition named as "your bizzare travel experience" .Hence Cost is partly compensated ;)

गुरुवार, २६ मे, २०२२

To step into his/her shoes

 शाळा कॉलेजातले आवडते शिक्षक , पूर्वीच्या नोकरीतले सीनियर्स अचानक भेटतात , काय कस चाललंय चौकशी करतात, तेव्हा अगदी मस्त  फिलिंग येऊन गेलेलं असतं. चेहऱ्यावर नकळत आनंद पसरून जातो..त्या पाच दहा मिनिटाकरता आपण नकळत त्या दिवसात भर्रकन फिरून आलेलो असतो  . 


मग काही काळाने  काही एक महिन्यांपूर्वी , वर्षाआधी तुम्हाला ज्युनियर असलेले ट्रेनीज , इंटर्नस , तुमचे विद्यार्थी तुम्हाला अचानक एका वळणावर भेटतात . हॅलो मॅम ! , ओह यू हाऊ आर यू करत संवाद साधला जातो .. त्यांचं सगळं मस्त  चालेलेल पाहून नकळत आपल्यालाच छान वाटून जातं.. कुठेतरी स्वतःलाच बरं वाटून जातं.. 


To step into his/ her shoes हा इंग्लिश भाषेतला माझा आवडता वाक्यप्रचार .!. आणि बिलिव्ह मी , स्वतःच्या शिक्षकांच्या , सीनियर्सच्या शूजमध्ये स्टेप इन होताना आलेलं एक भारी भन्नाट फिलिंग उरलेल्या दिवसाला हॅपी बनवून जातं ..

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

दास्तां ए बड़ी बांका !!!


गोष्ट सांगण हा प्रकार आपल्याला नवीन नाही. आईच्या , आजीच्या गोष्टी ऐकत आपण मोठे होतो. पोवाडा , गवळण इत्यादी साहित्य प्रकार  आपल्या परंपरेत आहेत. 

उर्दू साहित्यात या गोष्ट सांगण्याच्या प्रकाराला "दास्तानगोई" अस नाव आहे. यातल दास्ता ह्या शब्दाचा अर्थ गोष्ट आणि गोई म्हणजे सांगण. या प्रकाराची सुरुवात मुघल शासन काळात झाली. मुघल राजांच्या दरबारात दस्तांगो म्हणजे गोष्ट सांगणारे हा कलाप्रकार पेश करत. अर्थातच हा प्रकार दरबारी असल्याने पुरुष कलाकारच  सादर करत असत. ही कला  १९ व्या शतकापर्यंत दिल्ली , लखनौ इथे  बराच लोकप्रिय होती. १९२८ साली ही कला सादर करणारे दास्तागो मीर बकर अली यांच निधन झालं आणि ही कला जणू लुप्त पावली.  नंतर २००५ साली महमूद फारुकी यांनी या कलेच पुनरुज्जविन केलं. 

दास्तां गोइ प्रकाराला विषयाचं बंधन नाही. युद्ध, प्रेम , जादू, धोका , दुःख अश्या कोणत्याही विषयावर दास्ता गोईं सादर करता येते. ऐकण्यार्याच मनोरंजन करण हा मुख्य हेतू . 

तर ही कल्पना घेऊन अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर हे दोन  दास्तांगो  "दास्ता ए बडी बांका " नावाची मुंबई शहर ही थीम असलेली दास्ता गोई सादर करतात. गोरेगावच्या केशव गोरे ट्रस्टच्या सभागृहात या दास्ता गोइचा २५ वा प्रयोग आज पाहायला मिळाला. जवळपास दोन तासाचा हा प्रयोग आवर्जून बघावा असा आहे. किस्से, कहाण्या , चिमखडे बोल, विचार करायला लावणारी वाक्य, अचूक संदर्भ असणाऱ्या आणि योग्य ठिकाणी पेरलेल्या कविता , अधून मधून सांप्रत स्थितीवर घेतलेले चिमटे यामुळे प्रयोग रंगतो. प्रयोगाचा ठराविक असा फॉरमॅट नाही. त्यामुळे प्रेक्षक निवांत होत नाही. पुढे काय असेल ह्याची उत्सुकता निर्माण होते. कुठलीही गोष्ट सांगताना साधी सरळ असली की त्यात काही रस राहत नाही. इथ तस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेलीय. अक्षय आणि धनश्री हे दोघेही प्रचंड ऊर्जा असणारे कलाकार आहेत. त्या उर्जेचा पुरेपूर वापर प्रयोगात झालेला दिसतो. दोघांचं टायमिंग , योग्य वेळी घेतलेल्या जागा प्रयोग रंगतदार बनवतो. काहीसा इतिहासावर आधारित असूनही केवळ घडलेल्या घटनांची जंत्री न राहता ते क्षण आता आपण अनुभवत आहोत असा फिल प्रयोग पाहताना येतो. मुंबापुरीची चांगली वाईट वैशिष्ट्य वेगवेगळ्या ढंगात सादर करण्याची कला या दोघा कलाकारांनी लीलया साधली आहे. केवळ एक गादी आणि पाण्याचं दस्त या प्रॉपर्टीजवर , आवाज आणि शरीराच्या देहबोलीतून मुंबईच विश्वरुपदर्शन हे दोघे कलाकार घडवतात. 

आता काही अधिकाच्या अपेक्षा : प्रयोगाची संहिता गोळीबंद आहेच पण त्यातील काही भागांवर  थोडी कात्री चालवण हे इतर विषय घेण्याच्या दृष्टीने बर पडेल असं वाटत राहिलं . उदा . सुरुवातीचा प्राथनेचा भाग. तो जरा मिसमॅच वाटतो. त्याऐवजी मुंबईत विकसित झालेलं आयटी कल्चर , व्हाईट कॉलर टॉवर संस्कृती , गुज्जू, जैन यांचं मुंबईवर झालेलं सायलेंट  "अतिक्रमण" , इथली चित्रपटसृष्टी , कॉस्मो संस्कृती, एकंदरीतच मुंबैची उपनगर यांची नोंद प्रयोगात घेतली गेली पाहिजे अस वाटत राहिलं.

मुंबै ही आंधळ्याच्या हत्तीसारखी आहे. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे तिचं वर्णन करतो. इतक्या दशकांचा इतिहास लाभलेल्या मुंबैच दर्शन दोन तासात घडवण अवघड आहे. पण या दोघांनी कलाकारांनी ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे. या प्रयोगाचं रूपांतर पूर्ण लांबीच्या नाटकात व्हावं ही इच्छा आहे. प्रेक्षकांनीही आता या वेगळ्या प्रयोगांना साथ द्यावी ही अपेक्षा. 

या प्रयोगाना नेपथ्य वगैरेची भानगड नाही . घरी , सोसायटीत , ज्येनाच्या मंडळीत प्रयोग सहज सादर करता येतील .

शुक्रवार, २ जुलै, २०२१

इरफान !!!

 नेटफ्लिक्सवर तलवार चित्रपट (पुन्हा एकदा) बघत होते. चित्रपटाबद्दल प्रश्नच नाही . मूळ घटना हीच एक "सक्सेसफुल (?) " आडातील गूढकथा असल्याने पोहऱ्यातील चित्रपटदेखील जमलाच आहे.

पण चित्रपटात खरी गंमत आणतो तो इरफान आणि त्याच्या जोडीला प्रकाश बेलवाडी.
शेवटच्या २० मिनिटात या केसच नक्की कोर्टात कस सादरीकरण करायच यावर तपास अधिकाऱ्यांमध्ये चर्चा चालू असते. ही चर्चा एकाचवेळी चुरचुरीत संवादानी हसू आणणारी , तपास यंत्रणेच्या एकंदरीत कार्यशैलीवर बोट ठेवणारी आहे. या पूर्ण चर्चेत इरफान आणि प्रकाश धमाल आणतात . ऑफिसर दीक्षित आणि वेदांत शर्मा ठोकळेबाज पद्धतीनं विचार करत एकाहून एक पुरावे सादर करत असताना चिमटे घेत व्यंगात्मकरित्या खिल्ली उडवायच इरफान आणि प्रकाशच टायमिंग अफलातून आहे. त्यामुळेच इतक्या गंभीर विषयावर चर्चा होत असताना हसू येत आणि या जोडगोळीचे मुद्दे पटू लागतात. विशेषतः "अश्लील साहित्य , धर्मप्रचारक अवस्था या मुद्द्यावर दोघांनी दीक्षित आणि टीमला काढलेले चिमटे चांगलेच बोचरे आहेत . ह्यात संवाद लेखकाचं कौशल्य आहेच पण पडद्यावर ते अगदी सिंक्रोनायइज पद्धतीनं साजरं करण्याऱ्या इरफान, प्रकाशचही आहे. खून करताना वापरलेल हत्यार , टाइपोग्राफीकल एरर , ४ वेळा बदललेल रिपोर्ट या मुद्द्यांवर जेव्हा इरफान भाष्य करतो तेव्हा न राहवून मेंटलिस्टमधल्या सायमन बेकरची आठवण होते. तीच बोचरी शैली , कधी न राहवून उसळून येणं , नेमके प्रश्न विचारून समोरच्याला अडचणीत आणण सगळं काही तेच.
इरफान , तू अजून जगायला हवं होतंस !! खूप काही करू शकला असतास . पण शेवटी चित्रपटात तू म्हटलेले "वो अफसना जिसे अंजामतक लाना न हो मुमकिन , उसे एक खूबसुरत मोड देकर छोड देना ही अच्छा " हे साहिरचे शब्दच खरे आहेत आता !!!

ऊन

 ऑफिसातला एक नेहमीचा दिवस . कटकट करणारे सीनियर्स , नेहमीच्या डेडलाईनची रडारड , एसीची गोठलेली हवा , या सर्वात डोक्यात प्रश्नांचं भेंडोळ जमलेल असताना चेहऱ्यावर दिसू न देण्याची कॉर्पोरेट कसरत करत असलेले आपण . एका क्षणी डोक्यातल काहूर चेहऱ्यावर पसारायला सुरुवात होते. स्क्रीन धूसर दिसू लागते . डोळे जड होतात . पटकन फ्रेश होऊन येण्याच्या नावाखाली पाऊले वॉशरूमची वाट चालू लागतात . पण तिथून येऊनही काही होत नाही . सुरुवातीचं लो फिलिंग आता सिंक होऊनच थांबणार काय इतपत प्रकरण येतं .

आणि तेव्हाच टिंग टॉंग होतं .

फोन आपल्याच मातोश्रींचा असतो जीच्याबरोबर सकाळी पेल्यातल्या वादळाची नांदी झालेली असते . ह्म्म्म असा मनाशीच बोलून फोन उचलला जातो . पलीकडून प्रेमळ आवाज येतो . पेल्यातल वादळ अजूनही आपल्या डोक्यात असतंच . त्यामुळेच पलीकडच्या आवाजात एक आर्जवयुक्त सावधानता असते . ( इतक्या वर्षात माता आपल्याला ओळखू लागलेली असतेच . शेवटी तिचीच नाळ वगैरे ) आपल्या धुमसत्या बाळाने परत राख घालून घेऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीने बोललं जातं . त्या मूळच्या प्रेमळ आवाजामुळे आपल्याही चेहऱ्यावर हळूहळू दुधाची साय पसरत जाते . एकदम झाले मोकळे आकाश फिलिंग येतं . नकळत बर वाटायला लागत . हवं असलेलं विचारून फोन ठेवला जातो.
इथे मात्र आपल्या मनात श्रावणाच मोकळं , स्वच्छ , लख्ख ऊन पसरलेलं असत ...

चवीचं डॉक्युमेन्टेशन !

 तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं मात्र अत्यावश्यक!

पुढे यथावकाश चहाने आयुष्यात एंट्री घेतली . चहा आवडू लागला .मात्र अस्मादिकांचे चहा पिण्यातले नखरे बघून स्वतःचा चहा स्वतःच बनवायचा असं फर्मान निघालं. खरेतर चहा किंचित चॉकलेटी पांढरा असायला हवा , खूपप गोड नको , त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नको आणि "ताजाच" हवा , ज्यादा उकळलेला नको या अटी फार नव्हेत असे आमचे प्रांजळ मत आहे .पण हाय ये जालीम दुनिया ! तर ते असो ..

अश्या "नखऱ्या"मुळे हवा तसा परफेक्त चहा मिळणं दुरपास्त .स्वतः उठून खटपट करायचा कंटाळा आणि त्यामुळे चहा पिण्याचं प्रमाण कमी !

पण एकदा गंमत झाली . फायनल इयरच्या वेळी आजींना सोबत म्हणून आमच्या खोलीत अभ्यास करशील का अशी विचारणा नवीन शेजाऱ्याकडून (पक्षी :- आठल्ये काका )झाली .त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते .खरेतर आम्हीच त्या सोसायटीत नवे होतो. शेजारी चांगले होते त्यामुळे आढेवेढे घ्यायचा प्रश्न नव्हता . संध्याकाळी 4 ची वेळ होती. त्यामुळे चहा घेणार असा प्रश्न समोर आला . माझे चहा प्यायचे नखरे स्वतःला माहित असल्याने "नको नको" असं घुटमळून म्हणाले . तर मी नवीन असल्याने लाजतेय असा अर्थ आठल्ये काकांनी काढला . आणि माझ्या नकाराची दखल न घेता थोड्या वेळाने चहाचा कप समोर आणून ठेवला.

तो चहा बघताक्षणीच अरे आपल्याला हवा तसाच रंगाचा चहा आहे की असा उद्गार तोंडातून निघाला. "मात्र दिखावेपे मत जाव " असाही मनाने इशारा दिला .

तर चहाचा पहिला घोट घेताच वा ! हा माझा चहा असा जिभेने कौल दिला . मला हव्या तश्या पांढऱ्या चॉकलेटी रंगाचा , ज्यादा उकळी न आलेला ,कुठलेही मसाले घालून चव न बिघडवलेला असा तो चहा होता . नाही म्हणायला गवती चहाच पात होतं पण त्याने चव अजूनच एंहान्स झालेली . चहा आवडल्याने काकांना तस ताबडतोब सांगूनही टाकलं . ते फारच खुश झाले . आणि मग संध्याकाळचा चहा तू आमच्याकडेच घे असं निमंत्रणही दिलं .

आठल्ये काकांना चहा करायला फार आवडायचं . एखादी सुगरण तिची सिग्नेचर रेसिपी मन लावून करते त्या तन्मयतेने ते चहा करायचे . जीव ओतून चहा बनवल्याने त्यांचा चहा परफेक्त बनायचा आणि ती तन्मयता चहात उतरायची . ती फिकट तरीही किंचित गोडूस अशी चव अजूनही जिभेवर आहे .तसा चहा मी नंतर कुठेच प्यायले नाही . अगदी आठल्ये काकूंना पण तसा चहा जमायचा नाही . चहाच डिपार्टमेंट काकांकडे आहे असं त्या गंमतीने म्हणायच्या .आणि ते खरच होतं .चहा करायचा कंटाळा आलाय हे वाक्य चुकूनही त्यांच्या तोंडून ऐकलं नाही . अर्थात त्यांना स्वयंपाकघरातलं तेवढंच यायचं पण त्यातील मास्टरीवर ते स्वतः आणि इतरही खुश होते.

संध्याकाळी बाहेर कामं असल्याने अगदी रोज नाही तरी वरेचवर आठल्येआजींना सोबत जावं लागायचं .त्यांनी केलेला चहा मला आवडतो हे ठाऊक असल्याने काका माझा चहाचा कप तयार ठेवायचे . त्यांच्या या उत्साहाचं , कधीही न बिघडणाऱ्या रेसिपिच कौतुक केलं की ते फार खुश व्हायचे .

मला तुमच्यासारखा चहा बनवायला शिकवा असं मी सांगून टाकलेलं .आणि त्यांनीही ते कबूल केलेलं . मात्र ते कधीही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वर्क आउट झालंच नाही .तर ते राहूनच गेलं .

पुढे आम्ही ते घर बदललं आणि सगळंच थांबलं .तशीही चहाची सवय नसल्याने फार काही अडत नव्हतं.

मग साध्या आजाराचं निमित्त होऊन आठल्ये काका गेले आणि पाठोपाठ तो चहाही गेला . तसा चहा नंतर कुठेच मिळाला नाही .अगदी रेस्तराँमध्येही नाही .चहाची रेसिपी अशी काही अवघड नसली तरीही आठल्ये काकांची चहा करण्यातील असोशी /आवड त्यात नसल्याने ती चव जिभेवर पुढे आलीच नाही .माझी आजी म्हणायची तस स्वयंपाक चवदार होतो ते करण्याऱ्याच्या तन्मयेतेमुळे . त्याला चव असते .
मग आठल्ये काकांच्या चहाच्या रेसिपीच डॉक्यूमेन्टेशन झालं असत तरीही त्या चवीचं /त्या तन्मयतेच डॉक्युमेन्टेशन कुठून आणायचं होतं ?

बासुरीवाला

 "यशोमती मैया से पुछे नंदलाला , राधा क्यो गोरी मैं क्यू काला "

आज इतक्या दिवसांत बासुरीवर हे सूर ऐकले. करोनापूर्व काळात एक बासुरीवाला रोज बासुरीवर वेगवेगळी गाणी वाजवत सकाळी रस्त्यावर फेरफटका मारायचा. ऑफिसच्या आवराआवरीची वेळ आणि त्याची यायची वेळ जवळपास सारखीच असायची. आणि गाण्यातही व्हरायटी ! कधी परदेसी परदेसी जाना नहीं तर कधी अजीब दास्ता है ये . माझं घर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असल्याने त्याचा चेहरा कधी दिसला नाही पण सूर मात्र कानावर जरूर पडत.

नंतर लॉकडाऊन आला . वर्क फ्रॉम होम कधीही केव्हाही सुरू झालं आणि वेळाच बदलून गेल्या. त्याचबरोबरीने त्या वेळेना असलेलं सिंक्रोनायझेशन पण हरवलं . गेल्या 3 ते 4 महिन्यात एकदाही बासुरीचे सूर ऐकायला मिळाले नाहीत . लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या उत्साहात , नंतरच्या कंटाळ्यात , त्याही नंतरच्या वैतागात आपण हे सिंक्रोनायझेशन मिस करतोय हे लक्षातच आलं नाही. कळत नकळतपणे माणसं , भवताल कुठे कशी जोडल जात हे विसरूनच जायला झालं. कुठेतरी काही हरवूनच गेलं.

करोनाने हे सगळं हिरावून घेतलं म्हणायचं तर करोनापूर्व काळात आपण ह्या गोष्टीला तितक कधी महत्व दिले होते का हा प्रश्नही पडला. करोनाने हे सगळं बंद झालं की आपल्याला ह्या म्हटलं तर लहान असलेल्या गोष्टीची किंमत दाखवून दिली असा पेच पडलाय आता. किती सहजपणे आपण गोष्टी गृहीत धरतोय हे ही नीटच कळत गेलं.

आज इतक्या दिवसांत तो बासुरीवाला पुन्हा आला . त्याचे सूर आजही तसेच परफेक्ट होते. पण आज त्या सुरांनी हे संकट टळेल , कुठंतरी हे सगळं पुन्हा नीट चालू होईल , फिर वो सुबह आयेगी असा विश्वास वाटला आणि बरच वाटलं .

त्या बासुरीवाल्याला मी कधी पाहिलेलं नाही . पण त्याचे सूर ओळखीचे आहेत. उद्या परवा परत आला की धावत जाऊन एक छोटी का होईना बासुरी विकत घेईन . वेडगळपणाच वाटलं तर असू दे पण बाहेरचा आणि आतील भवताल जिवंत ठेवायला हे गरजेचं आहे हे मात्र नक्कीच .

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

लहान मुलीची लहान पोळी

 आज पोळ्या करण्याऱ्या काकूंनी ही गंमत केली आणि ते न सांगता. !.जेवायला बसत असताना पोळ्यांचा डबा उघडला आणि एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आलं ..

लहानपणी आई आणि आजी माझ्यासाठी मुद्दाम लहान मुलीची लहान पोळी बनवत असतं . त्यामागे मी आकर्षण वाटून नीट खाईन असा हेतू असायचा . "फक्त तुझ्यासाठी केलेय बरं का " ही फोडणी असायची .आपल्यासाठी स्पेशल केलेय या फिलिंगने इतरांना तु क देत मी ही खात असे.. आता ते सारं आठवून हसू येतेय.
अजून एक म्हणजे भातुकली खेळत असताना प्रत्येकाने काहीतरी घेऊन यायचं असा अलिखित नियम असे . आजी तेव्हा मला कुरमुरे , फुटाणे किंवा ही छोटी पोळी तयार असेल तर देत असे. मज्जा यायची तेव्हा . सगळे आपलं आपलं घेऊन यायचे आणि एकदम काला सदृश्य काहीतरी तयार व्हायचं . पण ते सगळेजण मिटक्या मारत खायचो.
तर पोळीचा आकार बघून "अरें ! आपण इतके मोठे झालोय तर " असं फिलिंग देणारी ही छोट्या मुलांची छोटी पोळी..

This small roti was prepared by our maid today and same gave me nostalgic feelings.
My mother and Grandma used to prepare this little roti for me. Their Additional graft was "we prepared this only for you and NOT for anyone" . The only aim of theirs was to made me eat . I also enjoyed the process with the feeling of superlative.
Further in childhood , we used to play "Bhatukali " or playing house . The unwritten rule of Game was that everyone contribute something. My Grandma used to fund me murmura , chana or this little roti. Such a Crazy thing !!!
So here is small little roti which give me feeling that " oh ! Now I am so grown up...



पेज / खिमाट

पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .

मला मात्र पेज /खिमाट हे नेहमी आजारी असतानाच पदार्थ वाटत आलाय . आजारी पडल्यावर तोंडाची चव गेली की आई /आजी हमखास पेज करतात . त्या बरोबर किंचित लोणच्याच्या खार . गेलेली चव परत यायची गॅरेटी. कधी कधी तर खास पेज पिण्यासाठी आजारी पडावं अस वाटत . करायलाही अगदी सोपा असं . मात्र पेजेची खास चव येण्यासाठी तांदूळ मात्र गावचेच हवेत . एक वाटी तांदुळला 5 ते 7 वाट्या पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ . ते आटून आटून एका पातळीला आलं की झाली पेज तयार .खिमाटसाठी अजून थोडं पाणी आटवायचं . एवढं सगळं झालं की वाडगाभर पेज ओरपायची .हो !ओरपायचीच .पेज /खिमाट काही नुसतं खायचा पदार्थ नाही . तो ओरपायचाच असतो .. वाडगा भरून पेज /खिमाट खाल्लं की दुपारपर्यतच्या वेळेची निश्चिती .

कारण नक्की काय ते माहीत नाही पण पेज /खिमाट शनिवारी करायची नाही असा दंडक आहे म्हणे आणि आई तो पाळते .त्यामुळे शनिवारी पेजेला बिग नो . घरी आम्ही आळशीपणा करत असलो आणि आजी कधी वैतागली तर तिच्या तोंडून 'वेळेला पेज आणि निजेला शेज ' असा शेरा हमखास बाहेर पडायचा . गंमत वाटायची तेव्हा ..
पेजेच थोडं नकारात्मक वर्णनही ऐकलं आहे . नुसत्या पेजेवर एखाद्याने दिवस काढले अस आजी कधी कधी जुन्या आठवणी सांगताना म्हणायची. ते सांगताना गळा दाटून आलेला असायचा तिचा . मधु मंगेश कर्णिकांच्या पुस्तकातही पेजेचा उल्लेख वाचलाय. एकंदरीतच पेज /खिमाट आणि कोकण यांचं नातं अतूट आहे .
तर आता वरील पेज/खिमाट पुराण ऐकल्यावर हा फोटो !



रविवार, ४ एप्रिल, २०२१

साडीची गोष्ट !!!

 माझ्या लहानपणी माझी आई ऑफिसात साड्याच नेसून जायची. मध्यमवर्गात त्या काळात सलवार सूट घालणे म्हणजे क्रांती . त्यातूनही सरकारी हापिसात ड्रेस घालणे म्हणजे contempt of court. मला आठवतंय मी एका कामानिमित्त अंधेरीत असलेल्या सीमाशुल्क ऑफिसात जीन्स घालून गेले होते. खरंतर मुद्दाम अस काही केलं नव्हतं. त्यावेळी खरंतर लक्षात आलं नाही आणि कामाच्या घाईत  तेवढा वेळही नव्हता. तर तिथल्या सरकारी बाबूंनी कुठला परग्रहावरील माणूस इथे आला असा लूक दिलेला. (माझं लहानपण ते उच्चशिक्षण होऊन य वर्ष लोटली तरीही . तर त्या अश्या सगळ्या प्रकारांमुळे कितीही वेळ झाला तरी आई साडीच नेसायची. आता साडी नेसण म्हणजे वेळखाऊ काम. परकर , ब्लाउज , पिन वगैरे सगळं रेडी ठेवावं लागतं. त्यात माझी आई म्हणजे एकदम भारी काम . साडी नीटच व्यवस्थित नेसली पाहिजे असा तिचा बाणा. सकाळची स्वयंपाक त्यात हे साडी प्रकरण. त्यामुळे ती लवकर उठून सगळं करायची. तिची ती सगळी लगबग गडबड बघून मला  साडी या प्रकाराबद्दल फारसं ममत्व नव्हतं. सकाळच सगळं करून, साडी नेसून  ठरलेली ९.१५ ची ट्रेन गाठणं हे तीच रुटीन. तर मला एवढ्या सकाळच्या घाईत तिची साडी नेसायचीच जबरदस्ती काही झेपायची नाही. पण त्याच्या मागच कारण मला नंतर कळलं जे वर लिहिलं आहेच. माझ्या आईला साडी ते सलवार सूट अस ट्रान्सफॉर्मेशन करायला माझं सीएस पूर्ण व्हावं लागलं. ते ही तिला खूप कंव्हीस केल्यावरच.

माझा स्वभाव घोळ घालत बसायचा नाही. मला सुटसुटीत कपडे अधिक आवडतात.कॉलेजमध्येही साडी डे असायचा तेव्हा मी  सलवार सूट घालून गेलेले. मैत्रिणींनी लावलेले बोल देखील चूपचापपणे ऐकून घेतलेले. ह्यात माझ्या कम्फर्टनेसचा भाग अधिक होता. 
खरंतर कामानिमित्त अनेक महिला आयएसएस ऑफिसरना /  कॉर्पोरेट सीईओना साडीत पाहिलेलं  आहे. उदाहरणार्थ मनीषा म्हैसकर, चंदा कोचर. या पॉवर वुमन ज्याप्रकारे ग्रेसफुली त्या साड्या नेसतात ते मला आवडतं. त्यात साडीचा रंग , चॉईस , accessories बरोबरच त्या पदाचा swag ही असतो. आणि मग मला मोह होतो साडी नेसायचा. पण साडी नेसायची म्हटली की आईची लगबग समोर यायची आणि मग माझा कॉन्फिडन्स हरवून जायचा. 
तर मग कॉलेजात टाळलं तरीही ऑफिसतले साडी डेज काही चुकले नाहीत. तिथे एच आर नावाचा प्राणी आणि टीम बिल्डिंग नावाचं पॅकेज अपरिहार्य असतं. तिथे कारणं चालत नाहीत. मग नवीन ऑफिस जॉईन केल्यावर एचआरचा दिवाळीनिमित्त इमेल आला ट्रेडिंशनल डे साजरा करायचा. मग काय ! आईकडे तिची साडी मागितली. पण तिने जीन्स , टॉप वगैरेची खरेदी पुरे झाली , आता जरा साड्याकडे बघ या निमित्ताने अस सुचवलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी आणि आई साडी खरेदीस गेलो. तिथल्या साड्यांचे एक एक प्रकार बघून माझी अवस्था घेशील किती दोन कराने अशी झाली. माहेश्वरी , नारायणपेठ, पैठणी , सिल्क , चंदेरी, खादी,जमदानी  अश्या कितीतरी प्रकारच्या साड्या !!! 
एक दोन साड्या दाखवून होताच दुकानदारला माझे साड्याविषयक प्रगाढ ज्ञान " अंकल , वो साडी मुझे फिट नहीं होगी प्रॉपर" या कमेण्टवरून लक्षात आले असावे , त्यामुळे माझ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायच्या भानगडीत न पडता त्याने इथे बॉस कोण आहे ते ओळखले आणि आई सांगेल ती साडी दाखवायचे सुरू केले. बरीच भवती न भवती केल्यावर अखेरीस निळी साडी  आईच्या आणि माझ्या पसंतीस आली. साडी खरेदी तर झाली , आता पुढची पायरी म्हणजे ब्लॉउज आणि इतर खरेदी. या प्रकाराने चांगलेच दमवले. परकरची योग्य शेड शोधण्यापासून ते टेलरला कश्या प्रकारचे ब्लॉउज हवे आणि त्याची डिलिव्हरी कधी देणार यापूर्ण प्रकारावर मातोश्रीनी चांगलेच बौद्धिक घेतले. दोनेक तास तरी त्या मार्केटमध्ये फिरत होतो. बरं हे सगळं झाल्यावर साडी नेसवणार कोण ही समस्या. माझ्या आईला काही हे जमत नव्हतं. मग आमच्या स्वयंपाकाच्या काकू धावून आल्या. त्यांनी साडी नेसायला मदत केली चांगल्या 4 ते 5 पिना लावून. त्यातही मध्येच साडी सुटली तर काय करायचे ह्यावर मोठं लेक्चर झोडल.एवढे सगळे सव्यापसव्य झाल्यावर प्रत्यक्ष ऑफिसात जायची वेळ आली तेव्हा पंचाईत झाली. ट्रेनने काही मला जमणार नाही अस जाहीर केलं तेव्हा मातोश्रीनी काय ह्या आजकालच्या मुली असा तुच्छ कटाक्ष टाकला आणि रिक्षेची सोय केली. ऑफिसात गेल्यावर तिथे वेगळंच वातावरण ! जेन्ट्स पुरुष कुर्त्यात एकदम एन्जॉय करत होते , काही सराईत लेडीज बाया साडी नेसून मस्त वावरत होत्या. आमच्यासारख्या पहिलटकरीण एकदम अवघडून गेलेल्या. बरं! ट्रॅडिशनल डे होता म्हणून एच आरने कामात सूट दिली नव्हती. काम होतच. आणि अश्यावेळी नेमकं ते अर्जंट असत. त्यामुळे ते एक टेन्शन. साडीची सवय  नसल्याने माझ्या सहकारीणीला मला टेन्शन आलेय साडीचे  म्हणून १० वेळा सांगितलं तेव्हा तिने वैतागून तू. क. दिला आणि आता लंचपर्यत अजिबात खुर्चीतून उठू नकोस अस बजावलं. निमूटपणे ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. पण लंचपर्यत मी जरा सैलवलेले आणि थोडं रिलॅक्स पण वाटू लागलेल. त्यामुळे लंचनंतर फोटोसेशन करून धमाल केेली. बॉसनेही मूड बघून कामाची खळखळ केली नाही. दिवस संपला, घरी परतताना रिक्षाच केली. कधी एकदा साडी सोडून रिलॅक्स होतेय अस झालेलं.फरफरा साडी सोडून , पिन अप काढून मोकळा श्वास घेतला.
 हे सगळं बघून मातेने कठीण आहे असा लूक दिला आणि आम्ही कश्या जायचो ऑफिसात , या मुलींना काहीच जमत नाही असा शेरा मारला. तर तुसी ग्रेट हो माँ  हा रिप्लाय देऊन चहा दे ना ची गळ घातली

तर अशी ही माझ्या साडी नेसण  या प्रकाराची गोष्ट. पुढच्या वर्षीच्या ट्रेडिंशनल डेला ही हाच एपिसोड थोड्याफार फरकाने रिपीट झाला. पण तेव्हा अनुभव असल्याने इतकं काही वाटलं नाही. आतातर  साडी नेसायची तर काय करावं लागतं आणि  नेसल्यावर काय करायचं असत याची  कल्पना आलेली आहे. पण आजही साडी नेसायची म्हटलं की ओह असा मनाशी येतच  आणि टेन्शन येतच.  पण कधीमधी ट्राय करायला हरकत नाही , वर्षातून किमान तीन वेळा तरी साडी नेसायचीच अस ठरवलं आहे  प्रॅक्टिस सुटू नये म्हणून . आता आई हयात नाही मार्गदर्शन करायला पण जमेल आणि जमवणारच आहे. 

सोमवार, २२ मार्च, २०२१

नवरात्र

 नवरात्रीच्या विशेष अश्या आठवणी म्हटल्या की आठवतं ते गरबा , बाजारातील धांदल , मामांचे उपवास, जोडून येण्याऱ्या सहामाही परीक्षा, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास त्यानंतरच्या दिवाळी सुट्टीच आकर्षण . पण जरा स्मृतीला ताण दिला की अजून आठवतात ती फूल (हेच आडनाव होतं) आणि आनंद ही आडनावं असणारी पंजाबी कुटुंब.

अस्सल धडधाकट आणि पंजाबी कुटुंब ! पैकी आनंदज मधला राहुल हा अत्यंत मस्तीखोर म्हणून पूर्ण कॉलॉनीत प्रसिद्ध . इतका आडदांड नी टिपिकल पंजाबी कुटुंबातील. दर दोन दिवसाआड शाळेत त्याच कोणाशी तरी भांडण असायचच. मग त्या मुलांच्या आईन राहुलच्या आईकडे तक्रार करणं , मग राहुलच्या आईने राहुलची वरात शाळा ते सोसायटी अशी काढणं ठरलेलं असायचं. 'राहुलने फिरसे आज कुछ किया लगता है ' बडबडत म्हातारी जिजी बाल्कनित बसलेली दिसायची. दोन्ही आनंद अंकल मात्र कधी भानगडीत पडताना दिसले नाहीत. मुलांना वाढवणे हे बायकांचे काम ही त्यांची समजूत . खरंतर दोन्ही आनंद आंटीज एकमेकींच्या बहिणीच होत्या सख्ख्या. गोऱ्यापान , काश्मिरी सफरचंदासारखी रसदार त्वचा. एकाच घरात दिलेल्या. पण अस असलं तरीही रोजची भांडण काही चुकायची नाहीत त्यांची. बहिणीपेक्षा जावा जावा हे नातं वरचढ ठरत असायचं .. भांडण झाले की थोड्या वेळाने सगळं आलबेल . या नात्यामुळे राहुल आणि पूनमला( त्याची चुलत बहीण /मावशीची मुलगी) आम्ही मुलं तुम्ही तुमच्या आयांना माँसी बोलावता की चाची म्हणून चिडवायचो. याउलट फूल अंकल आणि आंटी शांत स्वभावचे होते. मुलगा अमेरिकेत असल्याने इतरांशी जेवढ्यास तेवढे संबंध !!!
नवरात्रात मात्र आम्हाला विशेषतः मुलींना या दोन्ही कुटुंबाकडून एकदम राजेशाही ट्रीटमेंट ! याच कारण माताजींच दोन्ही कुटुंब एकदम भक्तिभावपूर्वक करायची. उधळलेल्या खोंडागत वागणारा राहुलही यावेळी एकदम शांत असायचा. साधारणपणे नवरात्रीच्या पाचव्या , अष्टमी , नवमीला आम्हा मुलींना स्पेशल आमंत्रण ! सकाळी एक १० च्या सुमारास मुलींच्या आयांना विचारून बोलवून घेतलं जायच. ६०च्या जिजी आणि दोन्ही आंटीज जातीने आमचे पाय वगैरे धुवून स्वच्छ करायच्या. मग माताजींका टिका लावायचा. प्रत्येकीला गुलाबाची फुल द्यायची ! देवीप्रमाणे पूजा करून ओवाळून घ्यायचं आणि आमच्या पाया पडायचं. खरी गंमत पुढे.. प्रत्येकीला हेअरक्लिप , नेलपेंट , पैसे ( प्रत्येकी ५ रुपये) , रुमाल, चुनरी अस काही ना काही मिळायचं. त्यावेळी पॉकेटमनी नामक हा प्रकार नव्हता. त्यामुळे ते मिळालेले आखे ५ रुपये मी माझ्याकडेच ठेंवणारे अस मी जाहीर करूनच यायचे. वर्षातून एकदाच हे सगळं असल्याने मातेची पण काही आडकाठी नसायची. हेअर क्लिप वगैरे मधून खास पंजाबी चॉईस दिसायची. सगळं एकदम चमचमीत आणि भडक. मला अजून आठवतं नवीन लग्न होऊन माझी मावशी आमच्याकडे आलेली . तेव्हा तिने टिपिकल ममव पद्धतीने मोजकेच दागिने आणि हलका मेकअप केलेला. दरवाज्यावरच फूल अंकल भेटले. त्यांनी तिला " बिटीया , नई नई शादी हुयी है तो कुछ अच्छे कपडे पहानो करो, दुलहन जैसी लगने चाहीये " असा सल्ला दिलेला. ते आठवून आम्ही आजही असतो. तर ते देवीचं सगळं अस भेटवस्तू मिळणं पंजाबी स्टाईलच. दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेलो की दोन दिवस त्यावर चर्चा ठरलेली. या भेटवस्तूबरोबरच खास पंजाबी पद्धतीचा भरपूर तूप निथळत असलेला गव्हाचा शिरा, त्यासोबत पुऱ्या आणि चण्यांची भाजी. या खाण्यात वगैरे मला इंटरेस्ट कमी असल्याने मी ते सरळ आईला नेऊन द्यायचं काम करायचे. तर 'मोठं' होईपर्यत हे सगळं अनुभवलं . त्यादिवसात पाया पडून घेणं, पूजा करवून घेणे हा आपला हक्क आहे असेच वाटायचं. बंधूरायांना या दिवसात फिलिंग जेलसी यायचं ते भांडण होईपर्यंत टिकायचे. कारण त्यांच्या हाती भोपळाच ..
सोसायटीच्या टॉवरपूर्व काळात ही दोन्ही कुटुंब भाईंदरवगैरे भागात राहायला गेली. तिथून पुढे काहीच संपर्क राहिला नाही. सगळे मोठे झाले . पूनमकी शादी हो गयी ( तिचं ते स्वप्न होतं) , फूल अंकल ह्या जगात नाहीत इतकंच कळलं. नवरात्र म्हटली की आठवतं ते इतकंच !!!

वाट

 चिडचिड सहन करणारी आई

थकलेल्या खांद्याला उभारी देणारे बाबा
दुधात आवडीची साय घालणारी आजी
वाढलेल्या ताटात हळूच माशाची तुकडी सरकवणारे आजोबा
धडपडून खर्चटन निघालं तर हात देणारे मैत्र
हळूहळू अदृश्य होत जातात
आपल्याही नकळतपणे !!!
अलगदपणे हात सोडवून घेत
आता आमची वेळ झाली म्हणत
पुढे काही बोलण्याची संधी न देता
सहजपणे निघून जातात
सैरभर, पंख तुटलेले आपण
शोधत राहतो तो आधार ,
ते हात इथे तिथे
खिडकीत वाट पाहून पाठीस आलेली रग
मग तशीच घुमसत राहते
डोळे कोरडे , वेळ कोरडी
समोरची कोरडी वाट मग कायमचीच....

जनरलायझेशन / गृहीतक

 जनरलायझेशन / गृहीतक हा लोकांच्या जगण्याच्या एक भाग आहे असं कधी मधी वाटू जातं. आता ह्यात लोकांच्या बिनडोक असण्याच्या भाग किती , डोक्यात घुसलेल्या किंवा घुसडवलेल्या पूर्वग्रहदूषिताचा भाग किती हे नीटस माहीत नाही. X गोष्ट अशी आहे मग त्या अनुषंगाने Y गोष्ट पण तशीच असणार ही गृहीतक बघून मजा येते कधी मधी.

म्हणजे आता बघा खूप शिकलेल्या मुलीना ( शिकलेली मुलगी हे मुळात पाssप , त्यातून जरा जादा शिकलेली म्हणजे महापाप ) स्वयंपाक पाणी जमणारे नाही हे जनरलायझेशन / गृहीतक .त्यांनी मग स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच (इथे आश्चर्ययुक्त इथे कुठे वाट चुकली भाव असलेल्या नजरा प्रथम झेलाव्या लागतात) patronizing करत न मागता दिलेल्या सल्लाची चवड सुरू. मग आता पाऊल ठेवलच आहे तर मग तिला काहीही येत नाही हे गृहीत धरून अत्यन्त बेसिकपणाची बडबड. अर्थातच त्या मुलीने ही बडबड शांतपणे ऐकून घ्यायची असते. मग पाळी येते ती हात धरून शिकवण्याची. एवढ्यातच मग बालिश सल्ले ऐकून मुलीचा प्रेशर कूकरचा व्हॉल्व्ह वाफ मोकळ होण्यासाठी धडपडत असतो पण तरीही डोकं शांत ठेवून हो हो करत राहायचं. पण मग थोडं तडकायला होतेच आणि मग त्या गरम वाफेचा चटका सल्लेकरी मंडळींना बसतो.तेव्हा मग ठीक है बाई , तुझं तू बघ म्हणत अंग झटकले जातं आणि सुटका होते पण ती तात्पुरती . कारण फायनल प्रॉडक्टच ऑडिट बाकी असतं.(त्यात फजिती होणारच आहे हे गृहीत धरून टोमणे सल्ले तयार असतात) .
एकदाच फायनल प्रॉडक्ट तयार झालं आणि ते मग आपल्यापेक्षाही सरस आहे हे लक्षात येताच अश्या सल्लेकरी मंडळींचा धीर खचू लागतो. पण मग नाक पडलेय हे मान्य तरी कसे करायचे!!! "होय ग , जमलं की तुला. थोडं फक्त अस हवं होतं पण जमेल पुढे " करत सारवासारव होते. पुढे मग " शिकलेय म्हणजे अगदीच काही ही नाही ह " असा आहेर मिळतो.
हीच ती वेळ असते बोलती बंद करायची. ही संधी सोडायची नाही. मग फायनल नेल इन द कॉफीनसाठी अजून एक खिळा ठोकायचा "काकू आता मी स्वयंपाक केला , आता ना तुम्ही माझी बॅलन्सशीट , लीगल document तयार करून द्या, दमले की बाई मी, जमेल ना तुम्हाला ? मी शिकवते की . चला नवीन काहीतरी शिकू आज " हे अत्यंत लाडिकपणाने म्हणायचं.. हे ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर वाजले की बारा हे भाव आणि मुलींच्या चेहऱ्यावर तेंडुलकरने त्या झिम्बाबेच्या खेळाडूला एकापाठोपाठ मारलेल्या सिक्सरचे भाव !!! प्रचंड आत्मिक समाधान म्हणजे काय असतं तो अनुभव येतो अश्यावेळी . बाजी पालटू लागलेली असते. काकूंच्या डोक्यात, चेहऱ्यावर कुठून हिच्या नादी लागलो हे भाव .. हॅ हॅ हॅ करत चला पानं वाढू करत काकू अचानकपणे दिसेनाश्या होतात.

गुरुवार, १८ मार्च, २०२१

विंडो शॉपिंग

 घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या मॉडेलवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.

*कट २*
पुढे यथावकाश नोकरी लागली. त्यामार्गे स्वतः ड्रेस विकत घेण्याची पतही आली. आजही त्या मॉलमध्ये ती दुकाने आहेत. दर्शनी भागात छान छान ड्रेस घातलेल्या मॅनेक्वीन आहेत . थोडक्यात मौका भी है और दस्तुर भी . पण आता ड्रेस विकत घ्यायची इच्छा होत नाही. तेव्हा त्या गोष्टीच अप्रूप होत. आजही त्या रस्त्यावरुन जाताना ते सुंदर ड्रेस दिसतात आणि अप्रूप वाटत . पण पुढे जायची इच्छा होत नाही . एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही. खूप सारी मेहनत करून एखादी। गोष्ट मिळवावी नि हातात आल्यावर हांतीच्या ! एव्हढ्यासाठी अट्टाहास करत होतो होय अस काहीसं होत.
कदाचित काही गोष्टींची मजा विंडोशॉपिंगमध्येच असावी

सावित्रीबाई फुले

 अकाउंटिंगमध्ये Capital Expenditure नावाची संज्ञा आहे. दीर्घ कालीन फायद्यासाठी केला जाणारा खर्च अस त्याच सामान्यकरण करता येईल. नावाप्रमाणेच या खर्चाचे परतावे मिळायला वेळ लागतो.

भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्याऱ्या सावित्रीबाईंनी असाच एक Capital Expenditure त्या काळी महाराष्ट्रच्या समाजकरणात केला होता. या खर्चाची पुरेपूर किंमत त्यांना चुकवावी लागली. शेणगोळे सहन करण्यापासून ते स्वतःच्या घरातून निष्कासित होण्यापर्यत. त्यावेळी त्या डगमगल्या नाहीत . खंबीर राहिल्या. आपलं काम करत राहिल्या.पुढे विसाव्या शतकात त्या खर्चाला गोमटी फळे येऊन मुली शिकू लागल्या. Capital expenditure चा परतावा व्याजासकट डोळ्यात भरेल इतपत..
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. शाळेत असताना सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत अस शिकवलं गेलं. सावित्रीबाईंचं नक्की काम काय होतं , त्याकामासाठी त्यांना काय सहन करावे लागले हे उमजण्याचे वय तेव्हा नव्हतं. ते कळत गेलं उच्चशिक्षण घेताना. कवडीचा संबंध नसलेले लोकं एवढं शिकायची काय गरज आहे ? शिकून काय दिवे लावणार छाप वाक्य प्रसवू लागले तेव्हा सावित्रीबाईंनी काय सहन केल असेल याची प्रचिती येऊ लागली.
उच्चशिक्षण घेणं आज मुलींसाठी फार अप्रूप राहिलेलं नाही. पण त्याचा पाया सावित्रीबाईंनी रचला. शेणगोळे अंगावर घेत अजिबात विचलित न होता प्रचलित समाजरूढीविरुद्ध जाणं अजिबातच सोपं नाही. ते ही मुली शिकल्या तर नवरा मरेल , घरादारचा नाश होईल इतपत दबाव आणला जात असताना.
काला अक्षर भैस बराबर हे वाक्य गंमतीत बोलायला ठीक आहे. पण सावित्रीबाईंनी तेव्हा पाऊल उचलले नसते तर आपणही अशिक्षित राहिलो असत अस कल्पना करून जरी पाहिलं तरी अंगावर काटा येतो. काहीही असो , तू शिकल पाहिजेच हे संस्कार आईने रुजवले ज्याचा पाया सावित्रीबाईनी रचला . त्याचा फायदा स्वतःच आत्मभान येण्यात झाला . हे आत्मभान मला आणि प्रत्येक मुलीला अनुभवू देण्याऱ्या सावित्रीबाई फुल्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भारतातील प्रत्येक मुलगी तुमची कायमची ऋणी राहील ...

आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...