रविवार, ४ एप्रिल, २०२१

साडीची गोष्ट !!!

 माझ्या लहानपणी माझी आई ऑफिसात साड्याच नेसून जायची. मध्यमवर्गात त्या काळात सलवार सूट घालणे म्हणजे क्रांती . त्यातूनही सरकारी हापिसात ड्रेस घालणे म्हणजे contempt of court. मला आठवतंय मी एका कामानिमित्त अंधेरीत असलेल्या सीमाशुल्क ऑफिसात जीन्स घालून गेले होते. खरंतर मुद्दाम अस काही केलं नव्हतं. त्यावेळी खरंतर लक्षात आलं नाही आणि कामाच्या घाईत  तेवढा वेळही नव्हता. तर तिथल्या सरकारी बाबूंनी कुठला परग्रहावरील माणूस इथे आला असा लूक दिलेला. (माझं लहानपण ते उच्चशिक्षण होऊन य वर्ष लोटली तरीही . तर त्या अश्या सगळ्या प्रकारांमुळे कितीही वेळ झाला तरी आई साडीच नेसायची. आता साडी नेसण म्हणजे वेळखाऊ काम. परकर , ब्लाउज , पिन वगैरे सगळं रेडी ठेवावं लागतं. त्यात माझी आई म्हणजे एकदम भारी काम . साडी नीटच व्यवस्थित नेसली पाहिजे असा तिचा बाणा. सकाळची स्वयंपाक त्यात हे साडी प्रकरण. त्यामुळे ती लवकर उठून सगळं करायची. तिची ती सगळी लगबग गडबड बघून मला  साडी या प्रकाराबद्दल फारसं ममत्व नव्हतं. सकाळच सगळं करून, साडी नेसून  ठरलेली ९.१५ ची ट्रेन गाठणं हे तीच रुटीन. तर मला एवढ्या सकाळच्या घाईत तिची साडी नेसायचीच जबरदस्ती काही झेपायची नाही. पण त्याच्या मागच कारण मला नंतर कळलं जे वर लिहिलं आहेच. माझ्या आईला साडी ते सलवार सूट अस ट्रान्सफॉर्मेशन करायला माझं सीएस पूर्ण व्हावं लागलं. ते ही तिला खूप कंव्हीस केल्यावरच.

माझा स्वभाव घोळ घालत बसायचा नाही. मला सुटसुटीत कपडे अधिक आवडतात.कॉलेजमध्येही साडी डे असायचा तेव्हा मी  सलवार सूट घालून गेलेले. मैत्रिणींनी लावलेले बोल देखील चूपचापपणे ऐकून घेतलेले. ह्यात माझ्या कम्फर्टनेसचा भाग अधिक होता. 
खरंतर कामानिमित्त अनेक महिला आयएसएस ऑफिसरना /  कॉर्पोरेट सीईओना साडीत पाहिलेलं  आहे. उदाहरणार्थ मनीषा म्हैसकर, चंदा कोचर. या पॉवर वुमन ज्याप्रकारे ग्रेसफुली त्या साड्या नेसतात ते मला आवडतं. त्यात साडीचा रंग , चॉईस , accessories बरोबरच त्या पदाचा swag ही असतो. आणि मग मला मोह होतो साडी नेसायचा. पण साडी नेसायची म्हटली की आईची लगबग समोर यायची आणि मग माझा कॉन्फिडन्स हरवून जायचा. 
तर मग कॉलेजात टाळलं तरीही ऑफिसतले साडी डेज काही चुकले नाहीत. तिथे एच आर नावाचा प्राणी आणि टीम बिल्डिंग नावाचं पॅकेज अपरिहार्य असतं. तिथे कारणं चालत नाहीत. मग नवीन ऑफिस जॉईन केल्यावर एचआरचा दिवाळीनिमित्त इमेल आला ट्रेडिंशनल डे साजरा करायचा. मग काय ! आईकडे तिची साडी मागितली. पण तिने जीन्स , टॉप वगैरेची खरेदी पुरे झाली , आता जरा साड्याकडे बघ या निमित्ताने अस सुचवलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी आणि आई साडी खरेदीस गेलो. तिथल्या साड्यांचे एक एक प्रकार बघून माझी अवस्था घेशील किती दोन कराने अशी झाली. माहेश्वरी , नारायणपेठ, पैठणी , सिल्क , चंदेरी, खादी,जमदानी  अश्या कितीतरी प्रकारच्या साड्या !!! 
एक दोन साड्या दाखवून होताच दुकानदारला माझे साड्याविषयक प्रगाढ ज्ञान " अंकल , वो साडी मुझे फिट नहीं होगी प्रॉपर" या कमेण्टवरून लक्षात आले असावे , त्यामुळे माझ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायच्या भानगडीत न पडता त्याने इथे बॉस कोण आहे ते ओळखले आणि आई सांगेल ती साडी दाखवायचे सुरू केले. बरीच भवती न भवती केल्यावर अखेरीस निळी साडी  आईच्या आणि माझ्या पसंतीस आली. साडी खरेदी तर झाली , आता पुढची पायरी म्हणजे ब्लॉउज आणि इतर खरेदी. या प्रकाराने चांगलेच दमवले. परकरची योग्य शेड शोधण्यापासून ते टेलरला कश्या प्रकारचे ब्लॉउज हवे आणि त्याची डिलिव्हरी कधी देणार यापूर्ण प्रकारावर मातोश्रीनी चांगलेच बौद्धिक घेतले. दोनेक तास तरी त्या मार्केटमध्ये फिरत होतो. बरं हे सगळं झाल्यावर साडी नेसवणार कोण ही समस्या. माझ्या आईला काही हे जमत नव्हतं. मग आमच्या स्वयंपाकाच्या काकू धावून आल्या. त्यांनी साडी नेसायला मदत केली चांगल्या 4 ते 5 पिना लावून. त्यातही मध्येच साडी सुटली तर काय करायचे ह्यावर मोठं लेक्चर झोडल.एवढे सगळे सव्यापसव्य झाल्यावर प्रत्यक्ष ऑफिसात जायची वेळ आली तेव्हा पंचाईत झाली. ट्रेनने काही मला जमणार नाही अस जाहीर केलं तेव्हा मातोश्रीनी काय ह्या आजकालच्या मुली असा तुच्छ कटाक्ष टाकला आणि रिक्षेची सोय केली. ऑफिसात गेल्यावर तिथे वेगळंच वातावरण ! जेन्ट्स पुरुष कुर्त्यात एकदम एन्जॉय करत होते , काही सराईत लेडीज बाया साडी नेसून मस्त वावरत होत्या. आमच्यासारख्या पहिलटकरीण एकदम अवघडून गेलेल्या. बरं! ट्रॅडिशनल डे होता म्हणून एच आरने कामात सूट दिली नव्हती. काम होतच. आणि अश्यावेळी नेमकं ते अर्जंट असत. त्यामुळे ते एक टेन्शन. साडीची सवय  नसल्याने माझ्या सहकारीणीला मला टेन्शन आलेय साडीचे  म्हणून १० वेळा सांगितलं तेव्हा तिने वैतागून तू. क. दिला आणि आता लंचपर्यत अजिबात खुर्चीतून उठू नकोस अस बजावलं. निमूटपणे ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. पण लंचपर्यत मी जरा सैलवलेले आणि थोडं रिलॅक्स पण वाटू लागलेल. त्यामुळे लंचनंतर फोटोसेशन करून धमाल केेली. बॉसनेही मूड बघून कामाची खळखळ केली नाही. दिवस संपला, घरी परतताना रिक्षाच केली. कधी एकदा साडी सोडून रिलॅक्स होतेय अस झालेलं.फरफरा साडी सोडून , पिन अप काढून मोकळा श्वास घेतला.
 हे सगळं बघून मातेने कठीण आहे असा लूक दिला आणि आम्ही कश्या जायचो ऑफिसात , या मुलींना काहीच जमत नाही असा शेरा मारला. तर तुसी ग्रेट हो माँ  हा रिप्लाय देऊन चहा दे ना ची गळ घातली

तर अशी ही माझ्या साडी नेसण  या प्रकाराची गोष्ट. पुढच्या वर्षीच्या ट्रेडिंशनल डेला ही हाच एपिसोड थोड्याफार फरकाने रिपीट झाला. पण तेव्हा अनुभव असल्याने इतकं काही वाटलं नाही. आतातर  साडी नेसायची तर काय करावं लागतं आणि  नेसल्यावर काय करायचं असत याची  कल्पना आलेली आहे. पण आजही साडी नेसायची म्हटलं की ओह असा मनाशी येतच  आणि टेन्शन येतच.  पण कधीमधी ट्राय करायला हरकत नाही , वर्षातून किमान तीन वेळा तरी साडी नेसायचीच अस ठरवलं आहे  प्रॅक्टिस सुटू नये म्हणून . आता आई हयात नाही मार्गदर्शन करायला पण जमेल आणि जमवणारच आहे. 

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...