शुक्रवार, २ जुलै, २०२१

Black eyed Susan flowers !

 Quick watercolors after a while..




इरफान !!!

 नेटफ्लिक्सवर तलवार चित्रपट (पुन्हा एकदा) बघत होते. चित्रपटाबद्दल प्रश्नच नाही . मूळ घटना हीच एक "सक्सेसफुल (?) " आडातील गूढकथा असल्याने पोहऱ्यातील चित्रपटदेखील जमलाच आहे.

पण चित्रपटात खरी गंमत आणतो तो इरफान आणि त्याच्या जोडीला प्रकाश बेलवाडी.
शेवटच्या २० मिनिटात या केसच नक्की कोर्टात कस सादरीकरण करायच यावर तपास अधिकाऱ्यांमध्ये चर्चा चालू असते. ही चर्चा एकाचवेळी चुरचुरीत संवादानी हसू आणणारी , तपास यंत्रणेच्या एकंदरीत कार्यशैलीवर बोट ठेवणारी आहे. या पूर्ण चर्चेत इरफान आणि प्रकाश धमाल आणतात . ऑफिसर दीक्षित आणि वेदांत शर्मा ठोकळेबाज पद्धतीनं विचार करत एकाहून एक पुरावे सादर करत असताना चिमटे घेत व्यंगात्मकरित्या खिल्ली उडवायच इरफान आणि प्रकाशच टायमिंग अफलातून आहे. त्यामुळेच इतक्या गंभीर विषयावर चर्चा होत असताना हसू येत आणि या जोडगोळीचे मुद्दे पटू लागतात. विशेषतः "अश्लील साहित्य , धर्मप्रचारक अवस्था या मुद्द्यावर दोघांनी दीक्षित आणि टीमला काढलेले चिमटे चांगलेच बोचरे आहेत . ह्यात संवाद लेखकाचं कौशल्य आहेच पण पडद्यावर ते अगदी सिंक्रोनायइज पद्धतीनं साजरं करण्याऱ्या इरफान, प्रकाशचही आहे. खून करताना वापरलेल हत्यार , टाइपोग्राफीकल एरर , ४ वेळा बदललेल रिपोर्ट या मुद्द्यांवर जेव्हा इरफान भाष्य करतो तेव्हा न राहवून मेंटलिस्टमधल्या सायमन बेकरची आठवण होते. तीच बोचरी शैली , कधी न राहवून उसळून येणं , नेमके प्रश्न विचारून समोरच्याला अडचणीत आणण सगळं काही तेच.
इरफान , तू अजून जगायला हवं होतंस !! खूप काही करू शकला असतास . पण शेवटी चित्रपटात तू म्हटलेले "वो अफसना जिसे अंजामतक लाना न हो मुमकिन , उसे एक खूबसुरत मोड देकर छोड देना ही अच्छा " हे साहिरचे शब्दच खरे आहेत आता !!!

आनंदछंद ऐसा़

 खरंतर या छंदाची ओळख लोकल प्रवासातून झालेली . लोकलने प्रवास करत असताना अनेक विक्रेते १० रुपये मैं कलरिंग बुक्स म्हणून ओरडत विकायला येत , आजही येतात.त्यात टॉम जेरी सारख्या कार्टूनची , बॅटमन ,आर्यनमॅन सारख्या सुपर हिरोजची , फळा ,फुलांचा चित्रांचा समावेश असतो . ह्या रंगकामाच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश लहान मुलाना रंगकाम , चित्रकामची ओळख करून देणे इतका असतो . त्यामुळे त्यात कुठच्या चित्राला कुठला रंग द्यायचा हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं. लहान मुलं चित्र रंगवत शांत बसावीत हा ही एक उद्देश असावा Wink

तर नेटवर बागडत असताना coloring activity या प्रकरणाचा शोध लागला .थोडं डोकावून पाहिलं असता अरे हे तर लोकलमध्ये विकतात त्याच छापाच आहे की असा प्रथमदर्शनी ग्रह झाला .त्यामुळे थोडं हसायलाच आलं . त्यात ही ऍक्टिव्हिटी स्ट्रेसबस्टर म्हणून केली जाते असंही लिहिलेलं . 'काय बाई , एकेक प्रकरण ' म्हणून सोडून दिलं .

अशातच प्राजक्ता पाटवेशी ओळख झाली . तिच्या पोस्टसमधून , चित्रातून ती अतिशय गुणी कलाकार असल्याचंही समजलं . त्यावेळी ती आणि अजून एक मायबोलीकर अल्पना या दोघी मिळून त्यांचं कलेशी संबंधित फेसबुक पान सुरू करत होत्या . असच एकदा प्राजक्ताशी गप्पा मारत असताना तिने तिच रंगकामाची पुस्तकं दाखवली . तेव्हा "अरे ! हे तर नेटवर बघितलेलं तेच की " ट्यूब पेटली . तेव्हा तिच्याकडून हे नक्की काय प्रकरण असतं हे समजून घेतलं . तिच्याशी बोलून बरच काही समजलं . त्यांनंतर दोस्तीखात्यात तिने तिची नुकतीच प्रसिद्ध झालेली ही कलरिंग पुस्तकं भेट म्हणून दिली.



तर coloring activity for adults हा छंद पाश्चिमात्य जगात बराच लोकप्रिय आहे. प्राजक्ताने बोलता बोलता तिने 2/3 फेसबुक ग्रुपची लिंकही दिली. हे ग्रुप पूर्णपणे ह्या छंदप्रकाराला वाहिलेले आहेत . तिकडचे रंगकाम बघून थक्क व्हायला होतं . वेगवेगळ्या देशातील लोकं ज्या उत्कृष्टपणे वेगवेगळ्या प्रकारचेरंगकाम करतात ते बघून परफेक्ट एवढंच मनात येतं. ह्या ग्रुपमुळेच ह्या छंदाला मी गांभीर्याने घेतलं .

प्राजक्ताने पुस्तक तर दिली पण माझी सुरुवात ग भ म न पासून होती . त्यामुळे तिला निरनिराळ्या शंका विचारून जेरीस आणलं . त्यात कोणते रंग वापरू , माध्यम कोणतं , कुठून सुरुवात करू , चुकलं तर काय करायचं असे वेगवेगळे प्रश्न विचारून पिडलं . ( तिला मला या छंदाची माहिती देण्याचा निश्चितच पश्चताप झालेला असणार Lol )

शेवटी camelin कंपनीच्या रंगीत पेन्सिल विकत आणल्या . आणि श्रीगणेशा केला . पहिलच चित्र रंगवलं आणि हे आपल्याला बऱ्यापैकी जमतंय याचा अंदाज आला .वर उल्लेख केलेल्या फेसबुक ग्रुपात ते चित्र टाकलं . तर तिथल्या लोकांना आवडलं . थोडा हुरूप आला आणि पुढचं चित्र रंगवायला घेतलं . ते ही जमलं .

हे पहिले चित्र रंगवलेल !!!



हळूहळू मला ही रंगकामाची ऍक्टिव्हिटी आवडायला लागली . मजा येऊ लागली . लहान मुलांच काम म्हणून अडगळीत टाकलेल्या ह्या छंदाने एक प्रकारचं रिलॅक्स फिलिंग दिलं . सातवीनंतर चित्रकला सोडूनच दिलेली . ती ह्या प्रकारात सापडली .रंगाचा सेन्स माझा चांगला आहे असे अनेक मित्र मैत्रिणी आवर्जून सांगतात . तो इथे रंगवताना कामी आला . प्राजक्ताच्या पुस्तकातली चित्र सुंदर आहेत त्यामुळे ती तितक्या सुंदरपणे रंगवली गेली पाहिजेत असंही मनाशी ठरवून घेतलं . त्यामुळे अजून मजा यायला लागली .

चित्र रंगवताना सध्या मी रंगीत पेन्सिलचा मुख्यतः उपयोग करते . पण अजूनही अनेक माध्यम वापरता येतात . जस की जेल पेन्स, स्केच पेन्स , रंगीत खडू . . कोणतं माध्यम वापरायचे ते आपल्यावर . शेवटी आनंद मिळणं महत्वाचं.

Coloring Activities मध्ये मंडल हा प्रकार लोकप्रिय आहे . मंडल हे गोलाकार आकारात असलेला वेगवेगळ्या फॉर्ममधला एक प्रकारचा चित्र प्रकार आहे. हिंदू , बौद्ध, जपनीज संस्कृतीत ह्याच मूळ सापडत . अधिक माहिती या लिंकवर मिळेल
https://en.m.wikipedia.org/wiki/Mandala

ही मी रंगवलेली दोन मंडल !!!
१) 



२) भाचीचे रंगीत खडू ढापून नुकतंच एक चित्र रंगवलं आहे . हे ते चित्र मंडल



हे अजून काही रंगकामचे नमुने .










Coloring app म्हणून प्ले स्टोर वर सर्च केल्यास अनेक app दिसतात . त्यावरूनही हा छंद जोपासता येऊ शकतो. पण त्याला कागदावर रंगवलेल्या रंगकामाची सर नाही हे अनुभवातून सांगू शकते Happy

हे रंगकाम करताना मजा येते हे खरं . चित्रावर फोकस करून रंगकाम करण्यात धमाल आहे.. पेशन्स या घटकाची कमतरता असलेल्या प्रत्येकाला ही ऍक्टिव्हिटी उपयुक्त आहे. नेटवर अतिरिक्त बागडून डोळे , मेंदू शिणवण्यापेक्षा तोच वेळ एक चित्र किंवा चित्रांचा तुकडा रंगवून पाहिलं तर छान वाटतं . मी माझी काही चित्र अशीच टप्याटप्यात पूर्ण केलीत .दुसरं एक म्हणजे हा छंद फार काही खर्चिक नाही . अमेझॉन , फ्लिपकार्टवर, क्रॉसवर्डमध्ये , प्राजक्ताच्या फेसबुकपेजवर रास्त किंमतीत विविध प्रकारची कलरिंग बुक्स, रंगीत पेन्सिल , खडू उपलब्ध आहेत . कुठेही लांबच्या प्रवासात ही रंगकाम ऍक्टिव्हिटी वेळ घालवायचा उत्तम मार्ग आहे . काही

तर सर्वांना Happy Coloring !!!

ऊन

 ऑफिसातला एक नेहमीचा दिवस . कटकट करणारे सीनियर्स , नेहमीच्या डेडलाईनची रडारड , एसीची गोठलेली हवा , या सर्वात डोक्यात प्रश्नांचं भेंडोळ जमलेल असताना चेहऱ्यावर दिसू न देण्याची कॉर्पोरेट कसरत करत असलेले आपण . एका क्षणी डोक्यातल काहूर चेहऱ्यावर पसारायला सुरुवात होते. स्क्रीन धूसर दिसू लागते . डोळे जड होतात . पटकन फ्रेश होऊन येण्याच्या नावाखाली पाऊले वॉशरूमची वाट चालू लागतात . पण तिथून येऊनही काही होत नाही . सुरुवातीचं लो फिलिंग आता सिंक होऊनच थांबणार काय इतपत प्रकरण येतं .

आणि तेव्हाच टिंग टॉंग होतं .

फोन आपल्याच मातोश्रींचा असतो जीच्याबरोबर सकाळी पेल्यातल्या वादळाची नांदी झालेली असते . ह्म्म्म असा मनाशीच बोलून फोन उचलला जातो . पलीकडून प्रेमळ आवाज येतो . पेल्यातल वादळ अजूनही आपल्या डोक्यात असतंच . त्यामुळेच पलीकडच्या आवाजात एक आर्जवयुक्त सावधानता असते . ( इतक्या वर्षात माता आपल्याला ओळखू लागलेली असतेच . शेवटी तिचीच नाळ वगैरे ) आपल्या धुमसत्या बाळाने परत राख घालून घेऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीने बोललं जातं . त्या मूळच्या प्रेमळ आवाजामुळे आपल्याही चेहऱ्यावर हळूहळू दुधाची साय पसरत जाते . एकदम झाले मोकळे आकाश फिलिंग येतं . नकळत बर वाटायला लागत . हवं असलेलं विचारून फोन ठेवला जातो.
इथे मात्र आपल्या मनात श्रावणाच मोकळं , स्वच्छ , लख्ख ऊन पसरलेलं असत ...

चवीचं डॉक्युमेन्टेशन !

 तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं मात्र अत्यावश्यक!

पुढे यथावकाश चहाने आयुष्यात एंट्री घेतली . चहा आवडू लागला .मात्र अस्मादिकांचे चहा पिण्यातले नखरे बघून स्वतःचा चहा स्वतःच बनवायचा असं फर्मान निघालं. खरेतर चहा किंचित चॉकलेटी पांढरा असायला हवा , खूपप गोड नको , त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नको आणि "ताजाच" हवा , ज्यादा उकळलेला नको या अटी फार नव्हेत असे आमचे प्रांजळ मत आहे .पण हाय ये जालीम दुनिया ! तर ते असो ..

अश्या "नखऱ्या"मुळे हवा तसा परफेक्त चहा मिळणं दुरपास्त .स्वतः उठून खटपट करायचा कंटाळा आणि त्यामुळे चहा पिण्याचं प्रमाण कमी !

पण एकदा गंमत झाली . फायनल इयरच्या वेळी आजींना सोबत म्हणून आमच्या खोलीत अभ्यास करशील का अशी विचारणा नवीन शेजाऱ्याकडून (पक्षी :- आठल्ये काका )झाली .त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते .खरेतर आम्हीच त्या सोसायटीत नवे होतो. शेजारी चांगले होते त्यामुळे आढेवेढे घ्यायचा प्रश्न नव्हता . संध्याकाळी 4 ची वेळ होती. त्यामुळे चहा घेणार असा प्रश्न समोर आला . माझे चहा प्यायचे नखरे स्वतःला माहित असल्याने "नको नको" असं घुटमळून म्हणाले . तर मी नवीन असल्याने लाजतेय असा अर्थ आठल्ये काकांनी काढला . आणि माझ्या नकाराची दखल न घेता थोड्या वेळाने चहाचा कप समोर आणून ठेवला.

तो चहा बघताक्षणीच अरे आपल्याला हवा तसाच रंगाचा चहा आहे की असा उद्गार तोंडातून निघाला. "मात्र दिखावेपे मत जाव " असाही मनाने इशारा दिला .

तर चहाचा पहिला घोट घेताच वा ! हा माझा चहा असा जिभेने कौल दिला . मला हव्या तश्या पांढऱ्या चॉकलेटी रंगाचा , ज्यादा उकळी न आलेला ,कुठलेही मसाले घालून चव न बिघडवलेला असा तो चहा होता . नाही म्हणायला गवती चहाच पात होतं पण त्याने चव अजूनच एंहान्स झालेली . चहा आवडल्याने काकांना तस ताबडतोब सांगूनही टाकलं . ते फारच खुश झाले . आणि मग संध्याकाळचा चहा तू आमच्याकडेच घे असं निमंत्रणही दिलं .

आठल्ये काकांना चहा करायला फार आवडायचं . एखादी सुगरण तिची सिग्नेचर रेसिपी मन लावून करते त्या तन्मयतेने ते चहा करायचे . जीव ओतून चहा बनवल्याने त्यांचा चहा परफेक्त बनायचा आणि ती तन्मयता चहात उतरायची . ती फिकट तरीही किंचित गोडूस अशी चव अजूनही जिभेवर आहे .तसा चहा मी नंतर कुठेच प्यायले नाही . अगदी आठल्ये काकूंना पण तसा चहा जमायचा नाही . चहाच डिपार्टमेंट काकांकडे आहे असं त्या गंमतीने म्हणायच्या .आणि ते खरच होतं .चहा करायचा कंटाळा आलाय हे वाक्य चुकूनही त्यांच्या तोंडून ऐकलं नाही . अर्थात त्यांना स्वयंपाकघरातलं तेवढंच यायचं पण त्यातील मास्टरीवर ते स्वतः आणि इतरही खुश होते.

संध्याकाळी बाहेर कामं असल्याने अगदी रोज नाही तरी वरेचवर आठल्येआजींना सोबत जावं लागायचं .त्यांनी केलेला चहा मला आवडतो हे ठाऊक असल्याने काका माझा चहाचा कप तयार ठेवायचे . त्यांच्या या उत्साहाचं , कधीही न बिघडणाऱ्या रेसिपिच कौतुक केलं की ते फार खुश व्हायचे .

मला तुमच्यासारखा चहा बनवायला शिकवा असं मी सांगून टाकलेलं .आणि त्यांनीही ते कबूल केलेलं . मात्र ते कधीही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वर्क आउट झालंच नाही .तर ते राहूनच गेलं .

पुढे आम्ही ते घर बदललं आणि सगळंच थांबलं .तशीही चहाची सवय नसल्याने फार काही अडत नव्हतं.

मग साध्या आजाराचं निमित्त होऊन आठल्ये काका गेले आणि पाठोपाठ तो चहाही गेला . तसा चहा नंतर कुठेच मिळाला नाही .अगदी रेस्तराँमध्येही नाही .चहाची रेसिपी अशी काही अवघड नसली तरीही आठल्ये काकांची चहा करण्यातील असोशी /आवड त्यात नसल्याने ती चव जिभेवर पुढे आलीच नाही .माझी आजी म्हणायची तस स्वयंपाक चवदार होतो ते करण्याऱ्याच्या तन्मयेतेमुळे . त्याला चव असते .
मग आठल्ये काकांच्या चहाच्या रेसिपीच डॉक्यूमेन्टेशन झालं असत तरीही त्या चवीचं /त्या तन्मयतेच डॉक्युमेन्टेशन कुठून आणायचं होतं ?

बासुरीवाला

 "यशोमती मैया से पुछे नंदलाला , राधा क्यो गोरी मैं क्यू काला "

आज इतक्या दिवसांत बासुरीवर हे सूर ऐकले. करोनापूर्व काळात एक बासुरीवाला रोज बासुरीवर वेगवेगळी गाणी वाजवत सकाळी रस्त्यावर फेरफटका मारायचा. ऑफिसच्या आवराआवरीची वेळ आणि त्याची यायची वेळ जवळपास सारखीच असायची. आणि गाण्यातही व्हरायटी ! कधी परदेसी परदेसी जाना नहीं तर कधी अजीब दास्ता है ये . माझं घर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असल्याने त्याचा चेहरा कधी दिसला नाही पण सूर मात्र कानावर जरूर पडत.

नंतर लॉकडाऊन आला . वर्क फ्रॉम होम कधीही केव्हाही सुरू झालं आणि वेळाच बदलून गेल्या. त्याचबरोबरीने त्या वेळेना असलेलं सिंक्रोनायझेशन पण हरवलं . गेल्या 3 ते 4 महिन्यात एकदाही बासुरीचे सूर ऐकायला मिळाले नाहीत . लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या उत्साहात , नंतरच्या कंटाळ्यात , त्याही नंतरच्या वैतागात आपण हे सिंक्रोनायझेशन मिस करतोय हे लक्षातच आलं नाही. कळत नकळतपणे माणसं , भवताल कुठे कशी जोडल जात हे विसरूनच जायला झालं. कुठेतरी काही हरवूनच गेलं.

करोनाने हे सगळं हिरावून घेतलं म्हणायचं तर करोनापूर्व काळात आपण ह्या गोष्टीला तितक कधी महत्व दिले होते का हा प्रश्नही पडला. करोनाने हे सगळं बंद झालं की आपल्याला ह्या म्हटलं तर लहान असलेल्या गोष्टीची किंमत दाखवून दिली असा पेच पडलाय आता. किती सहजपणे आपण गोष्टी गृहीत धरतोय हे ही नीटच कळत गेलं.

आज इतक्या दिवसांत तो बासुरीवाला पुन्हा आला . त्याचे सूर आजही तसेच परफेक्ट होते. पण आज त्या सुरांनी हे संकट टळेल , कुठंतरी हे सगळं पुन्हा नीट चालू होईल , फिर वो सुबह आयेगी असा विश्वास वाटला आणि बरच वाटलं .

त्या बासुरीवाल्याला मी कधी पाहिलेलं नाही . पण त्याचे सूर ओळखीचे आहेत. उद्या परवा परत आला की धावत जाऊन एक छोटी का होईना बासुरी विकत घेईन . वेडगळपणाच वाटलं तर असू दे पण बाहेरचा आणि आतील भवताल जिवंत ठेवायला हे गरजेचं आहे हे मात्र नक्कीच .

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...