शुक्रवार, २ जुलै, २०२१

बासुरीवाला

 "यशोमती मैया से पुछे नंदलाला , राधा क्यो गोरी मैं क्यू काला "

आज इतक्या दिवसांत बासुरीवर हे सूर ऐकले. करोनापूर्व काळात एक बासुरीवाला रोज बासुरीवर वेगवेगळी गाणी वाजवत सकाळी रस्त्यावर फेरफटका मारायचा. ऑफिसच्या आवराआवरीची वेळ आणि त्याची यायची वेळ जवळपास सारखीच असायची. आणि गाण्यातही व्हरायटी ! कधी परदेसी परदेसी जाना नहीं तर कधी अजीब दास्ता है ये . माझं घर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असल्याने त्याचा चेहरा कधी दिसला नाही पण सूर मात्र कानावर जरूर पडत.

नंतर लॉकडाऊन आला . वर्क फ्रॉम होम कधीही केव्हाही सुरू झालं आणि वेळाच बदलून गेल्या. त्याचबरोबरीने त्या वेळेना असलेलं सिंक्रोनायझेशन पण हरवलं . गेल्या 3 ते 4 महिन्यात एकदाही बासुरीचे सूर ऐकायला मिळाले नाहीत . लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या उत्साहात , नंतरच्या कंटाळ्यात , त्याही नंतरच्या वैतागात आपण हे सिंक्रोनायझेशन मिस करतोय हे लक्षातच आलं नाही. कळत नकळतपणे माणसं , भवताल कुठे कशी जोडल जात हे विसरूनच जायला झालं. कुठेतरी काही हरवूनच गेलं.

करोनाने हे सगळं हिरावून घेतलं म्हणायचं तर करोनापूर्व काळात आपण ह्या गोष्टीला तितक कधी महत्व दिले होते का हा प्रश्नही पडला. करोनाने हे सगळं बंद झालं की आपल्याला ह्या म्हटलं तर लहान असलेल्या गोष्टीची किंमत दाखवून दिली असा पेच पडलाय आता. किती सहजपणे आपण गोष्टी गृहीत धरतोय हे ही नीटच कळत गेलं.

आज इतक्या दिवसांत तो बासुरीवाला पुन्हा आला . त्याचे सूर आजही तसेच परफेक्ट होते. पण आज त्या सुरांनी हे संकट टळेल , कुठंतरी हे सगळं पुन्हा नीट चालू होईल , फिर वो सुबह आयेगी असा विश्वास वाटला आणि बरच वाटलं .

त्या बासुरीवाल्याला मी कधी पाहिलेलं नाही . पण त्याचे सूर ओळखीचे आहेत. उद्या परवा परत आला की धावत जाऊन एक छोटी का होईना बासुरी विकत घेईन . वेडगळपणाच वाटलं तर असू दे पण बाहेरचा आणि आतील भवताल जिवंत ठेवायला हे गरजेचं आहे हे मात्र नक्कीच .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...