तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं मात्र अत्यावश्यक!
पुढे यथावकाश चहाने आयुष्यात एंट्री घेतली . चहा आवडू लागला .मात्र अस्मादिकांचे चहा पिण्यातले नखरे बघून स्वतःचा चहा स्वतःच बनवायचा असं फर्मान निघालं. खरेतर चहा किंचित चॉकलेटी पांढरा असायला हवा , खूपप गोड नको , त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नको आणि "ताजाच" हवा , ज्यादा उकळलेला नको या अटी फार नव्हेत असे आमचे प्रांजळ मत आहे .पण हाय ये जालीम दुनिया ! तर ते असो ..
अश्या "नखऱ्या"मुळे हवा तसा परफेक्त चहा मिळणं दुरपास्त .स्वतः उठून खटपट करायचा कंटाळा आणि त्यामुळे चहा पिण्याचं प्रमाण कमी !
पण एकदा गंमत झाली . फायनल इयरच्या वेळी आजींना सोबत म्हणून आमच्या खोलीत अभ्यास करशील का अशी विचारणा नवीन शेजाऱ्याकडून (पक्षी :- आठल्ये काका )झाली .त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते .खरेतर आम्हीच त्या सोसायटीत नवे होतो. शेजारी चांगले होते त्यामुळे आढेवेढे घ्यायचा प्रश्न नव्हता . संध्याकाळी 4 ची वेळ होती. त्यामुळे चहा घेणार असा प्रश्न समोर आला . माझे चहा प्यायचे नखरे स्वतःला माहित असल्याने "नको नको" असं घुटमळून म्हणाले . तर मी नवीन असल्याने लाजतेय असा अर्थ आठल्ये काकांनी काढला . आणि माझ्या नकाराची दखल न घेता थोड्या वेळाने चहाचा कप समोर आणून ठेवला.
तो चहा बघताक्षणीच अरे आपल्याला हवा तसाच रंगाचा चहा आहे की असा उद्गार तोंडातून निघाला. "मात्र दिखावेपे मत जाव " असाही मनाने इशारा दिला .
तर चहाचा पहिला घोट घेताच वा ! हा माझा चहा असा जिभेने कौल दिला . मला हव्या तश्या पांढऱ्या चॉकलेटी रंगाचा , ज्यादा उकळी न आलेला ,कुठलेही मसाले घालून चव न बिघडवलेला असा तो चहा होता . नाही म्हणायला गवती चहाच पात होतं पण त्याने चव अजूनच एंहान्स झालेली . चहा आवडल्याने काकांना तस ताबडतोब सांगूनही टाकलं . ते फारच खुश झाले . आणि मग संध्याकाळचा चहा तू आमच्याकडेच घे असं निमंत्रणही दिलं .
आठल्ये काकांना चहा करायला फार आवडायचं . एखादी सुगरण तिची सिग्नेचर रेसिपी मन लावून करते त्या तन्मयतेने ते चहा करायचे . जीव ओतून चहा बनवल्याने त्यांचा चहा परफेक्त बनायचा आणि ती तन्मयता चहात उतरायची . ती फिकट तरीही किंचित गोडूस अशी चव अजूनही जिभेवर आहे .तसा चहा मी नंतर कुठेच प्यायले नाही . अगदी आठल्ये काकूंना पण तसा चहा जमायचा नाही . चहाच डिपार्टमेंट काकांकडे आहे असं त्या गंमतीने म्हणायच्या .आणि ते खरच होतं .चहा करायचा कंटाळा आलाय हे वाक्य चुकूनही त्यांच्या तोंडून ऐकलं नाही . अर्थात त्यांना स्वयंपाकघरातलं तेवढंच यायचं पण त्यातील मास्टरीवर ते स्वतः आणि इतरही खुश होते.
संध्याकाळी बाहेर कामं असल्याने अगदी रोज नाही तरी वरेचवर आठल्येआजींना सोबत जावं लागायचं .त्यांनी केलेला चहा मला आवडतो हे ठाऊक असल्याने काका माझा चहाचा कप तयार ठेवायचे . त्यांच्या या उत्साहाचं , कधीही न बिघडणाऱ्या रेसिपिच कौतुक केलं की ते फार खुश व्हायचे .
मला तुमच्यासारखा चहा बनवायला शिकवा असं मी सांगून टाकलेलं .आणि त्यांनीही ते कबूल केलेलं . मात्र ते कधीही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वर्क आउट झालंच नाही .तर ते राहूनच गेलं .
पुढे आम्ही ते घर बदललं आणि सगळंच थांबलं .तशीही चहाची सवय नसल्याने फार काही अडत नव्हतं.
मग साध्या आजाराचं निमित्त होऊन आठल्ये काका गेले आणि पाठोपाठ तो चहाही गेला . तसा चहा नंतर कुठेच मिळाला नाही .अगदी रेस्तराँमध्येही नाही .चहाची रेसिपी अशी काही अवघड नसली तरीही आठल्ये काकांची चहा करण्यातील असोशी /आवड त्यात नसल्याने ती चव जिभेवर पुढे आलीच नाही .माझी आजी म्हणायची तस स्वयंपाक चवदार होतो ते करण्याऱ्याच्या तन्मयेतेमुळे . त्याला चव असते .
मग आठल्ये काकांच्या चहाच्या रेसिपीच डॉक्यूमेन्टेशन झालं असत तरीही त्या चवीचं /त्या तन्मयतेच डॉक्युमेन्टेशन कुठून आणायचं होतं ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा