सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

पसार्याची गोष्ट !



मातोश्री फार्फार हिंट द्यायला लागल्या तेव्हा म्हटल आता ते जुनं कपाट आवरुनच टाकाव. (थंड असलेल्या हिमालयातून ज्वालामुखी ऊसळण्याआधी कार्यवाही केलेली बरी असा सुज्ञ विचार त्यापाठी होताच.) तशी मी फार हुशार आणि गुणी मुलगी आहे हे माझ स्वतच अस मत आहे.आणि ही पोस्ट वाचणारे वाचक माझ्या मित्रयादीच्या कक्षेत येत असल्याने त्यांनाही हे मत पटल असल्याची शक्यता अगदी दोनशे टक्के आहेच. ( नाही म्हणून सांगतात कोणाला ? लग्गेच अन्फ्रेंड करेन. प्लीज मज्य्शी मयत्री कर्णार का ? वगैरे ना अजिब्ब्बात धूप घातली जाणार नाही )
तर ते असो !

हातात एक ओला रुमाल , टाइम्स ऑफ़ इंडियाचे गुळगुळित ग्लॉसी असे दोनचार कागद सोबत घेऊन मी मिशन रद्दी या मोहिमेवर सज्ज झाले. कपाट ऊघडल तस ते भस्स्कन अंगावरच आलं. thanks to my maintaining activity...

 सर्वात आधी त्या कपाटातील पुस्तक , स्टिकर्स , पेपर्स जे जे काय हाताला लागल ते पहिल काढून जमिनीवर ठेवलं. तस करताच गाठ सोडवलेल्या दोराप्रमाणे कपाट सुट्लचं. जमिनीवर नजर टाकली तर पसार्याने एकूण क्षेत्रफ़ळाच्या पाव टक्के भागावर आपला हक्क सांगितला आहे हे ही लक्षात आलं. ते पाहून 'पाहिल ना मी काय सांगत होते ते ' असा घरचा आहेर मिळाला. पण त्यासाठी नळी फूंकली वारे इकडे तिकडे चा मी यशस्वी प्रयोग केला.तर ते असो !

आता पाळी होती ती पसार्याच्या वर्गीकरणाची. वर्गीकरण करत असतानाच आपण काय कार्टूनगिरी करून ठेवलिये याचा अंदाज येत होताच. काय नव्हत त्या पसार्यात ! मैत्रीणीनी दिलेल्या ग्रीटिंग्ज कार्डापासून ते वर्गातल्या कंटाळवाण्या तासाला काढलेल्या शिक्षकान्च्या व्यंग्यचित्रापर्यत सर्व काही त्या कपाटाने सामावून घेतल होतं. कंटाळवाण्या तासाला आमची चित्रकला विशेष बहरत असे . पण आमच्या शिक्षकाना त्याच काहीsssएक कौतुक नव्हत. नाहीतर आपल्या भारतातही एक पिकासोचा अवतार तयार झाला असता. दुर्देव भारताच ! दुसर काय... तर ते असो ..
 
पसार्याच्या वर्गीकरणाला इयत्तेच बंधन नव्हत बर का ! त्या बाबतीत आमची दृष्टी पहिल्यापासूनच उदार.. यत्ता पाचवी ते शैक्षणिक पदवीच्या आवाक्यातल सार काही त्यात सुखनैव नांदलेलं . त्यात " कुछ कुछ होता है" चा फ्रेंडशिप बैंड सापडला. त्याचा रंग विशेष आवडला होता म्हणून तो दुसर्या मैत्रिणीकडून बदलून घेतलेलां. दहावीच्या वर्गात असतानाचा पूर्ण वर्गासोबतचा ग्रुप फोटो , कॉलेजमध्ये असताना केलेल्या भटकंतीचे फोटो , कॉलेजच्या बोरिंग लेक्चरला केलेल्या कविता ( शाळेतल्या पिकासोची जागा आता वर्डस्वर्थने घेतली होती ) , वेगवेगळ्या फैशन मैगज़ीन मधले सौदर्यविषयक लेख , ट्रेक विषयक लेख , स्टीकर्स , गैदरिंग मध्ये संयोजक मोडात असताना काढलेल्या नोट्स , त्या फीती ,कॉलेजच मैगज़ीन , आयकार्डस अस आणि बरच काही सापडलं.
दुपारच्या शोजची जीर्ण झालेली चित्रपटाची तिकिटेही सापडली. पण तो त्या काळातल्या निरानिराळ्या कलांचा आस्वाद घेण्याचा अभ्यासाचा एक भाग होता हे वाचकांनी लक्षात घ्यावे . व्यक्तीमत्व अष्टपैलू असल पाहिजे यावर आमचा पहिल्यापासूनच भर..तर ते ही असो !
 
वरील परिच्छेद वाचून शाळा कॉलेज मध्ये आम्ही फक्त उनाड्क्या केल्या असा वाचक वर्गाचा समज झाला असेल तर तो साफ़ चुकीचा आहे हे ' अर्नब गोस्वामी ' शैलीत निदर्शनास आणून देऊ इच्छिते . पसार्याचा काही भाग विज्ञान विषयाचा प्रयोगवह्या , इंग्लिशची अवांतर पुस्तके , काही पेपर्स वगैरेनी व्यापलेला होता. आवडता विषय असलेला गणित विषयाच्या पुस्तकांचा त्यात अधिक भरणा होता ( ही आपली उगाच माहिती ) . पुढे त्यात मैनेजमेंट , एकाउंटिंग , लॉ वगैरे पुस्तकांची भर पड़त गेली. ओह येस करियर विषयक पुस्तकांची यादी ध्यान्यात घ्यावी लागेलच. तिरिमिरित येऊन ग्रंथालयात काढलेल्या नोट्स, क्लासेसच्या नोट्स , परीक्षेसाठीच्या ख़ास झेरोक्स केलेल्या नोट्स , बंक केलेल्या पीरियड्सच्या नोट्स अस वैविध्य त्यात होतचं.काही ख़ास कापून ठेवलेली कात्रणही सापडली.( हां गुण पिताश्रीकडून उधार ) Kindly look to versatility point.. तर ते असो !

 
आता वर्गीकरण झाल तर पाळी आली रद्दीत वस्तू द्यायची .मग आमची घालमेल सुरु झाली . हे देऊ की ते देऊ ? ते राहु देत ना पुस्तक ! अजून पुस्तक उपयोगी पडू शकतेच ना वगैरे वगैरे .. मग पसारा संग्रामात फसलेल्या या अभिमन्युला बाहेर काढण्यासाठी मातृदेवता पदर खोचून मदतीला आली . त्या आधी ' हिचा सोस काही संपणार नाही , नेहमीच आहे ते ' असे उदगार कानी आले. त्यात एक दोन वेळा आमच्या लुडबूडीमुळे एक टिपिकल मातोश्री लुक मिळाला पण आम्ही ही काही कमी नव्हतो .वर्षाआरंभी एचआरला पटवून सुट्टी पदरात पाडून घ्यायची कला अवगत झाली असल्याने भैय्याची रद्दी एक चतुर्थांशने कमी झाली. शेवटी अखेर भैया नामक प्राण्याला बोलावून उरलेला पसारा त्याच्या स्वाधीन करण्यात आला .. ह्म्म्म असो !

आता ते कपाट व्यवस्थित दिसतं. नीट लावल गेलयं ना ! सुट्सुटित वगैरे वगैरे . पसारा काढतानाच एकेक वस्तूचा जीवंतपणा जाणवलेला. त्या आठवणी ती मजा जणू एकमेकांना घट्ट बिलगलेली . अरे ते पेन त्या माटुंग्यावरुन घेतलेल . ते मैस्कॉट असच काढलेल . फुटकळ कविता जुने पुराणे तेव्हा महत्वाचे वाटलेले पेपर्स . बरच काही .. त्या दोनेक तासात अश्या बर्याच आठवणी जाग्या झालेल्या
परत एकदा त्या जगात जगून घेतल. शेवटी हर पसारा कुछ कहता है ..

 
आता ते कपाट थोड शिष्ट वाटत . नाही नाही स्वच्छ झालय म्हणून नाही. तसे ते स्वच्छ तेव्हाही होतेच . पण तेव्हा ते खच्चून भरलेल. उघडता क्षणिच अंगावर आलेलं . आता त्याचा रिकामेपणा जाणवेल इतपत अंगावर येतो.
बट डोंट वरी ते कपाट कस भरायच हे ही माहीत आहेच. सुरुवातही केलीये . त्याची गोष्ट नंतर कधीतरी !
 

© Jaee Sarwankar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...