गुरुवार, १८ मार्च, २०२१

ओ_वुमनिया

 भारतात स्त्रीशिक्षणाचा पायंडा सावित्रीबाई फुलेंनी पाडला आणि वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या स्त्रीवर्गाला प्रकाशाची वाट दिसली. सुरुवातीला मुली शिकल्या की डोक्यावर बसतील म्हणून खळखळ करण्याऱ्या भारतीय समाजाने हळूहळू मुलींचं शिकणं मान्य केलं. मात्र या शिकलेल्या मुली आपल्याच ताब्यात राहाव्यात , जुन्या काळापासून आलेल्या परंपरा तश्याच चालत राहाव्यात ही मानसिकता कायम होतीच. त्यामुळे मुली कितीही शिकलेल्या असोत त्यांना घरकाम , स्वयंपाकपाणी आलंच पाहिजे हे कटाक्षाने बघितलं जायच. साधारणपणे बँक , शाळेत नोकरी त्यांनतर वयाच्या पंचविशीपर्यत लग्न , त्यानंतर मुलं अशी व्यवस्था ९०च्या दशकापर्यत कायम होती. थोडक्यात स्त्रियांची भूमिका नेहमीच दुय्यम असणारी. समाजाच्या या मानसिकतेच प्रतिबिंब भारतीय जनमानसावर प्रभाव पाडण्याऱ्या चित्रपट या माध्यमात न पडत तरच नवल. हिंदी / मराठी चित्रपटातील त्या काळच्या नायिका म्हणजे नायकाच्या प्रेमप्रकरणाची गरज भागवण्याऱ्या , पटकथेत चिमूटभर सजवण्यापूरत रोल असण्याऱ्या आणि तो रोलही प्रामुख्याने टिपिकल शामळू मुलींचाच. या मुली जास्तीत जास्त एमए शिकलेल्या असत. त्या खानदान की इज्जत वगैरे मानत, वडीलधार्यांनी ठरवलेल्या स्थळाशी लग्नगाठ बांधण्याऱ्या , त्यासाठी आपल्या प्रेमाला तिलांजली देण्याऱ्या ,लग्नापूर्वी शारीरिक संबंध म्हणजे रौरवनरकाच पाप , नवरा म्हणजे सर्वस्व , लग्नानंतर मुलंबाळात रमण्याऱ्या , सगळं सांभाळून असण्याऱ्या, प्रेमस्वरूप , मातृस्वरूप , वात्सल्यपूर्ण अश्या स्वरूपात असत. त्यांच्या चित्रपटातील अस्तित्वाला तसाही अर्थ चटणीसारखा . तोंडी लावायला.

हे नाहीतर मग या शामळूपणाच दुसरं टोक म्हणजे व्हॅम्प भूमिका करण्याऱ्या स्त्रिया. या बाया व्हिलनला रिझवायच काम करत . अगदीच गरज पडली तर त्याच्या वतीने खूनबिन छळकपट पण करत. पण त्याही चार पाच सीनपुरतं मर्यादित. आखी स्टोरीलाईन हिरो आणि व्हिलनपुरतं सीमित झालेली.
नाही म्हणायला अपवाद अर्थ , मिर्चमसालासारख्या चित्रपटांचा. पण ते तुरळक .
आर्थिक उदारीकरणानंतर मात्र भारतीय समाजात बरेच बदल घडून आले. मेट्रो शहरांचा उदयही ह्याच काळातील. भारतीय समाजात बऱ्यापैकी नवे वारे वाहू लागले ते या काळात.शिक्षणाची गंगा याच काळात घरी पोहोचली आणि या शिक्षणाने आत्मनिर्भर स्वयंपूर्ण बनलेल्या मुलींची एक नवी आत्मविश्वासी पिढी या काळात उदयाला आली.
मल्टीप्लेक्सच्या उदयाने या काळात चित्रपट क्षेत्रातही बदल घडून आले. तेच ते टिपिकल विषय असणाऱ्या चित्रपटाव्यतिरिक्त अनेक विविध विषय हाताळणारे दिग्दर्शक पुढे आले . या दिग्दर्शकानी आर्थिक उदारीकरणात अस्तित्वात आलेल्या नवीन मध्यमवर्गीय समाजाच चित्रण करायला सुरुवात केली. या चित्रपटातूनच मग आतापर्यंत दुय्यम भूमिका असण्याऱ्या , बहुतांशवेळा फक्त नायकाच्या प्रेमपात्राची भूमिका बजवण्याऱ्या , हॅपी एंडिंगपुरतं मर्यादित असण्याऱ्या स्त्रीपात्रांची भूमिका बदलली गेली आणि त्यातूनच पिकू , इंग्लिश विंग्लिशसारखे नवमध्यमवर्गीय नायिकाप्रधान सिनेमे येऊ लागले.
पिकू सिनेमातील पिकू या मिलेनियम पिढीच प्रतिनिधित्व करणारी. जाहिरात क्षेत्रात काम करत असताना स्वतःच्या ९० वर्षाच्या वडिलांचा हेकेखोरपणा सांभाळत त्यांच्यावर तितकेच मनस्वी प्रेम करणारी. पिकूच लग्नाच वय झालेय पण म्हणून ती पूर्वाश्रमीच्या नायिकासारख घराण्यावर बोज टाइप मनस्थिती करून राहत नाही. स्वतःच्या लैगिंक जाणीवांची स्पष्ट कल्पना तिला स्वतःला आहे . त्यासाठी तिला समाजाच्या परवानगीची गरज नाही. तिलाही लग्न करायचं आहे पण ते स्वतःच्या अटीवर. रोजच्या अडचणींना सामोरे जात , त्यावर सोपे तोडगे काढत मनःपूत जगायचा प्रयत्न करणारी मनस्वी पिकू भावते ती यामुळेच. तिला आलेला दिवस भरभरुन जगायचा आहे. त्या दिवसाच्या जिंकण्या हरण्याची पर्वा तिला नाही.
पिकू ही मेट्रो शहरातील मुलगी तर बरेली की बर्फी मधील बिट्टी ही tier 3 सारख्या शहराच प्रतिनिधित्व करणारी. स्त्रियांनी कस नाजूकच असलं पाहिजे , त्यांच्या वागण्या बोलण्यात स्त्री संस्कार झळकलेच पाहिजेत ही समाजाची अपेक्षा. मुलगी साधं कशी बसलीये यावरून तिला जोखल जात असताना बिट्टीच्या वागण्या बोलण्यात दिसणारं सो कॉल्ड पुरुषपण तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर बोट (?) रोखतं.बिट्टी बिनधास्तपणे सिगारेट ओढते , स्कुटर चालवते, रोजच्या वरपरीक्षेला कंटाळून घरातून पळूनही जाते. पण बिट्टी ठाम आहे ती तिच्या विचारांवर . आपल्याला कोणत्या प्रकारचा जोडीदार हवाय याची स्पष्ट कल्पना तिला आहे आणि तो मिळेपर्यंत थांबायची तयारी. इतरजणी करत आहेत म्हणून कोणाच्याही गळ्यात हार घालायची तिची तयारी नाही. न पटलेल्या विचारांवर प्रश्न विचारायची हिंमत तिच्यात आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील हे बिनधास्तपण , वैचारिक ठामपण तिच्याकडे आकर्षित करायला पुरेस आहे.
क्वीनमधली लग्न मोडल्यावर खचून न जाता नव्याने जगायला सुरुवात करणारी राणी सगळ्यांनाच आवडलेली. पण मला स्वतःला आवडली ती बोल्ड आणि बिनधास्त विजयालक्ष्मी. विजयालक्ष्मी उर्फ व्हीजे ही एकल पालक आहे. पॅरिससारख्या शहरात वेट्रेसच काम करून ती स्वतःच्या मुलाला वाढवतेय. एकल पालक असली तरीही तिला स्वतःच्या शरीराच्या गरजा आहेत आणि त्या गरजांचा उच्चार करण्यात , त्यांना पूर्ण करण्यात तिला कोणत्याही प्रकाराचा अपराधगंड वाटत नाही. स्वतःच आयुष्य उत्फुल्लतेने जगत असतानाच निराश झालेल्या राणीला धीर द्यायचं काम ती सहजतेने करतेय. ही खळाळत हसत प्रसन्न असणारी व्हीजे आपल्या आयुष्यातही एक मैत्रीण म्हणून असायला हवी अस मनापासून वाटत राहतं सिनेमा संपताना.
मुली कितीही कर्तृत्ववान शिकल्या बिकल्या असल्या तरीही त्यांनी पहिलं प्राधान्य द्यावं ते स्वतःच्या घरसंसाराला , मुलांबाळांना. अगदी समाजाच्या शिक्षित वरच्या थरातही ही मानसिकता झिरपलेली आहे. दिल धडकने दो मधील आयेशा ह्या विचारसरणीची बळी आहे. स्वतःच्या भावापेक्षा अधिक कर्तृत्ववान असूनही , घरचा व्यवसाय एकहाती सांभाळायची हिंमत असूनही आयेशा लग्न करते कारण लग्नाचं वय झालेलं असत पण ते लग्नही स्वतःच्या मनाविरुद्ध. लग्न झाल असलं तरीही मी काही करून दाखवू शकते हे घरच्यांना पटवून देण्याची तिची धडपड अस्वस्थ करते. चित्रपटात शेवटी आयेशा स्वतःच्या मनासारखं निर्णय घेते खरी पण वास्तवात किती स्त्रियांना असा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आणि हिंमत असते हा वेगळा मुद्दा. आयेशाची गोष्ट करियरच्या आघाडीवर काही करून दाखवण्याची आस बाळगण्याऱ्या पण घराकडे अगदीच दुर्लक्ष करते ही बया असा समाजाने दिलेला गिल्ट बाळगणाऱ्या स्त्रियांचं प्रातिनिधिक चित्रण करते.
इंग्लिश विंग्लिशमधील शशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची. मध्यमवयीन गृहिणी हा सर्वच्या दृष्टीने दुर्लक्षित विषय. शशीच शिक्षण तितकेसे नाही , फारसं 'एक्सपोझर' नाही . त्यामुळे स्वतःच्या इंग्रजी माध्यमात शिकण्याऱ्या टीनएज मुलांच्या वेगाबरोबर , बाहेरच नियमित एक्सपोझर असण्याऱ्या आधुनिक नवऱ्याबरोबर जुळवून घेताना तिची दमछाक होतेय. घरच्या लोकांचं प्रत्येक गोष्टीसाठी गृहीत धरलं जाणं तिला अवस्थ करतं पण त्याकडे दुर्लक्ष करत ती स्वतःचा छोटेखानी व्यवसाय सांभाळत आहे. ही विजिगिषु वृत्ती तिला पूर्णत: नवीन देशात राहून नवीन काही शिकायला बळ देते आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर घरातील सदस्यांना प्रत्येक सदस्य समान आहे असं ठामपणे सुनावायची हिंमतही देते! रोजच्या जगण्यातील अडथळ्यांवर मात करत , हिंमतीवर जगण्याऱ्या अश्या अनेक शशी आपल्या आजूबाजूला सापडतील. तुम्हारी सुलूमधली सुलू ही अशीच . स्वतःच अस्तित्व शोधायला उत्सुक असणारी . त्यात अडथळे पार करत स्वतःला सिद्ध करणारी..
मसानमधल्या देवी उर्फ रिचा चद्धाने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याच घोर पातक केलेलं आहे. त्यामुळे संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेल्या समाजातील सो कॉल्ड कावळ्यांना तिला टोचे मारायचं लायसन्सही मिळालेलं आहे. एका बाजूला हे टोचेही सहन करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रियकराचा झालेला मृत्यूही. मात्र एका क्षणी असह्य होऊन देवी हे दडपण झुगारून देते आणि स्वतःच्या प्रगतीला प्राधान्य देते. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही हा विश्वास ठेवून , बंधन झुगारून ती पुढे पाऊल टाकते. नैतिक अनैतिकतेच ओझं पूर्णपणे स्रियांच्या खांद्यावर टाकून संस्कृती राखायला बघण्याऱ्या समाजाला देवीचं हे पाऊल म्हणजे एक सणसणीत चपराकच आहे.
जाता जाता उल्लेख करावासा वाटतो तो मर्दानीमधील शिवानी रॉयचा. पुरुषी वर्चस्व असण्याऱ्या पोलीस क्षेत्रात असून चाईल्ड ट्रॅफिकिंग रोखणारी , त्यातील गुन्हेगारांना एकहाती शासन करणारी बेडर शिवानी रॉय.शारीरिक आणि मानसिक पातळीवर कमालीचा आत्मविश्वास दाखवत स्त्रिया घाबरट असतात या समाजाला छेद देणारी. तसाच आवर्जून उल्लेख करायला हवा तो NH - १० मधील अनुष्का शर्माच्या भूमिकेचा. नवऱ्याच्या मृत्यूनंतर खचून न जाता , स्वतः जखमी झालेली असूनही नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेऊन स्त्री पेटून उठली तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते याचा प्रत्यय देणारी ही भूमिका. त्याचबरोबर समाजाच्या पितृसत्ताक मानसिकतेवर प्रश्न उठवणारीदेखील.. एक हसीना थी मधील उर्मिलाची भूमिकाही अशीच जबरदस्त. प्रियकराने फसवल्यावर त्यापायी तुरुंगाची हवा खावी लागल्यावर उन्मळून रडून न जाता थंड डोक्याने विचार करत प्लॅनिंग करणारी , आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जिवाच रान करणारी, प्रेमात स्त्रिया क्षमाशील असतात या टिपिकल मानसिकतेला धक्का देणारी , सूडाने पेटून उठणारी आणि तो सूड घेतल्यावरच शांत बसणारी , दुर्गेचा अवतार धारण करणारी सारिका .. नेहमीच्या समजुतींना धक्का द्यायचं काम ह्या नायिका करतात.
ह्या सिनेमांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातील नायिका परिस्थितीने गांजलेल्या , टिपिकल मुळुमुळु रडण्याऱ्या नाहीत. त्या बऱ्यापैकी सुखवस्तू घरातील असून पैसा राखून आहेत . वेळ आलीच तर बॅकसीटवर न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याऱ्या आहेत . पण हे दोन हात करणेही आक्रस्ताळेपणासारख नाही. नीट विचार करून , व्यवस्थित भूमिका घेऊन आपलं नाणं त्या चोख बजावत आहेत. मुख्य म्हणजे आधीच्या नायिकाप्रमाणे बाबा वाक्य प्रमाणम न म्हणता हे अस का ? विचारण्याच धाडस त्यांच्यात आहे. घेतलेले निर्णय निभावण्याची क्षमता देखील आहे. परंपरा वगैरेच्या अति नादाला न लागता लवचिकतेने जगणं त्यांनी स्वीकारलं आहे. ह्या नायिका आधीच्या सिनेमाप्रमाणे प्रेमपूर्ण ,
करुणासिंधू नाहीत. त्यांही इतरांप्रमाणेच हाडामासाच्या आणि मोह , मत्सर , राग , लोभ, प्रेम अश्या विकारांनी युक्त आहेत. किंबहुना अश्या असण्यानेच त्यांचं रियल असणं उठून दिसतं.
या स्त्रिया आपल्या रोजच्या जगण्यात दिसण्याऱ्या आहेत. आपल्यासारखेच रोजचे प्रश्न त्यांना पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरही त्या रोजच्या जगण्यात शोधत आहेत. या स्त्रिया जादूची कांडी फिरवून सुपरहिरोसारख अडचणी संपवून टाकत नाहीत. वास्तव जगासारख त्यावर उपाय शोधतात . ही स्त्रीपात्रे जवळची वाटतात ते वैशिष्टयामुळेच. तर या कणखर , मजबूत स्त्रियांची संख्या समाजात आणि पर्यायाने चित्रपटात वाढो हे या महिलादिनाच विशफुल थिंकिंग !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...