अकाउंटिंगमध्ये Capital Expenditure नावाची संज्ञा आहे. दीर्घ कालीन फायद्यासाठी केला जाणारा खर्च अस त्याच सामान्यकरण करता येईल. नावाप्रमाणेच या खर्चाचे परतावे मिळायला वेळ लागतो.
भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्याऱ्या सावित्रीबाईंनी असाच एक Capital Expenditure त्या काळी महाराष्ट्रच्या समाजकरणात केला होता. या खर्चाची पुरेपूर किंमत त्यांना चुकवावी लागली. शेणगोळे सहन करण्यापासून ते स्वतःच्या घरातून निष्कासित होण्यापर्यत. त्यावेळी त्या डगमगल्या नाहीत . खंबीर राहिल्या. आपलं काम करत राहिल्या.पुढे विसाव्या शतकात त्या खर्चाला गोमटी फळे येऊन मुली शिकू लागल्या. Capital expenditure चा परतावा व्याजासकट डोळ्यात भरेल इतपत..
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. शाळेत असताना सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत अस शिकवलं गेलं. सावित्रीबाईंचं नक्की काम काय होतं , त्याकामासाठी त्यांना काय सहन करावे लागले हे उमजण्याचे वय तेव्हा नव्हतं. ते कळत गेलं उच्चशिक्षण घेताना. कवडीचा संबंध नसलेले लोकं एवढं शिकायची काय गरज आहे ? शिकून काय दिवे लावणार छाप वाक्य प्रसवू लागले तेव्हा सावित्रीबाईंनी काय सहन केल असेल याची प्रचिती येऊ लागली.
उच्चशिक्षण घेणं आज मुलींसाठी फार अप्रूप राहिलेलं नाही. पण त्याचा पाया सावित्रीबाईंनी रचला. शेणगोळे अंगावर घेत अजिबात विचलित न होता प्रचलित समाजरूढीविरुद्ध जाणं अजिबातच सोपं नाही. ते ही मुली शिकल्या तर नवरा मरेल , घरादारचा नाश होईल इतपत दबाव आणला जात असताना.
काला अक्षर भैस बराबर हे वाक्य गंमतीत बोलायला ठीक आहे. पण सावित्रीबाईंनी तेव्हा पाऊल उचलले नसते तर आपणही अशिक्षित राहिलो असत अस कल्पना करून जरी पाहिलं तरी अंगावर काटा येतो. काहीही असो , तू शिकल पाहिजेच हे संस्कार आईने रुजवले ज्याचा पाया सावित्रीबाईनी रचला . त्याचा फायदा स्वतःच आत्मभान येण्यात झाला . हे आत्मभान मला आणि प्रत्येक मुलीला अनुभवू देण्याऱ्या सावित्रीबाई फुल्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भारतातील प्रत्येक मुलगी तुमची कायमची ऋणी राहील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा