जनरलायझेशन / गृहीतक हा लोकांच्या जगण्याच्या एक भाग आहे असं कधी मधी वाटू जातं. आता ह्यात लोकांच्या बिनडोक असण्याच्या भाग किती , डोक्यात घुसलेल्या किंवा घुसडवलेल्या पूर्वग्रहदूषिताचा भाग किती हे नीटस माहीत नाही. X गोष्ट अशी आहे मग त्या अनुषंगाने Y गोष्ट पण तशीच असणार ही गृहीतक बघून मजा येते कधी मधी.
म्हणजे आता बघा खूप शिकलेल्या मुलीना ( शिकलेली मुलगी हे मुळात पाssप , त्यातून जरा जादा शिकलेली म्हणजे महापाप ) स्वयंपाक पाणी जमणारे नाही हे जनरलायझेशन / गृहीतक .त्यांनी मग स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच (इथे आश्चर्ययुक्त इथे कुठे वाट चुकली भाव असलेल्या नजरा प्रथम झेलाव्या लागतात) patronizing करत न मागता दिलेल्या सल्लाची चवड सुरू. मग आता पाऊल ठेवलच आहे तर मग तिला काहीही येत नाही हे गृहीत धरून अत्यन्त बेसिकपणाची बडबड. अर्थातच त्या मुलीने ही बडबड शांतपणे ऐकून घ्यायची असते. मग पाळी येते ती हात धरून शिकवण्याची. एवढ्यातच मग बालिश सल्ले ऐकून मुलीचा प्रेशर कूकरचा व्हॉल्व्ह वाफ मोकळ होण्यासाठी धडपडत असतो पण तरीही डोकं शांत ठेवून हो हो करत राहायचं. पण मग थोडं तडकायला होतेच आणि मग त्या गरम वाफेचा चटका सल्लेकरी मंडळींना बसतो.तेव्हा मग ठीक है बाई , तुझं तू बघ म्हणत अंग झटकले जातं आणि सुटका होते पण ती तात्पुरती . कारण फायनल प्रॉडक्टच ऑडिट बाकी असतं.(त्यात फजिती होणारच आहे हे गृहीत धरून टोमणे सल्ले तयार असतात) .
एकदाच फायनल प्रॉडक्ट तयार झालं आणि ते मग आपल्यापेक्षाही सरस आहे हे लक्षात येताच अश्या सल्लेकरी मंडळींचा धीर खचू लागतो. पण मग नाक पडलेय हे मान्य तरी कसे करायचे!!! "होय ग , जमलं की तुला. थोडं फक्त अस हवं होतं पण जमेल पुढे " करत सारवासारव होते. पुढे मग " शिकलेय म्हणजे अगदीच काही ही नाही ह " असा आहेर मिळतो.
हीच ती वेळ असते बोलती बंद करायची. ही संधी सोडायची नाही. मग फायनल नेल इन द कॉफीनसाठी अजून एक खिळा ठोकायचा "काकू आता मी स्वयंपाक केला , आता ना तुम्ही माझी बॅलन्सशीट , लीगल document तयार करून द्या, दमले की बाई मी, जमेल ना तुम्हाला ? मी शिकवते की . चला नवीन काहीतरी शिकू आज " हे अत्यंत लाडिकपणाने म्हणायचं.. हे ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर वाजले की बारा हे भाव आणि मुलींच्या चेहऱ्यावर तेंडुलकरने त्या झिम्बाबेच्या खेळाडूला एकापाठोपाठ मारलेल्या सिक्सरचे भाव !!! प्रचंड आत्मिक समाधान म्हणजे काय असतं तो अनुभव येतो अश्यावेळी . बाजी पालटू लागलेली असते. काकूंच्या डोक्यात, चेहऱ्यावर कुठून हिच्या नादी लागलो हे भाव .. हॅ हॅ हॅ करत चला पानं वाढू करत काकू अचानकपणे दिसेनाश्या होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा