नवरात्रीच्या विशेष अश्या आठवणी म्हटल्या की आठवतं ते गरबा , बाजारातील धांदल , मामांचे उपवास, जोडून येण्याऱ्या सहामाही परीक्षा, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास त्यानंतरच्या दिवाळी सुट्टीच आकर्षण . पण जरा स्मृतीला ताण दिला की अजून आठवतात ती फूल (हेच आडनाव होतं) आणि आनंद ही आडनावं असणारी पंजाबी कुटुंब.
अस्सल धडधाकट आणि पंजाबी कुटुंब ! पैकी आनंदज मधला राहुल हा अत्यंत मस्तीखोर म्हणून पूर्ण कॉलॉनीत प्रसिद्ध . इतका आडदांड नी टिपिकल पंजाबी कुटुंबातील. दर दोन दिवसाआड शाळेत त्याच कोणाशी तरी भांडण असायचच. मग त्या मुलांच्या आईन राहुलच्या आईकडे तक्रार करणं , मग राहुलच्या आईने राहुलची वरात शाळा ते सोसायटी अशी काढणं ठरलेलं असायचं. 'राहुलने फिरसे आज कुछ किया लगता है ' बडबडत म्हातारी जिजी बाल्कनित बसलेली दिसायची. दोन्ही आनंद अंकल मात्र कधी भानगडीत पडताना दिसले नाहीत. मुलांना वाढवणे हे बायकांचे काम ही त्यांची समजूत . खरंतर दोन्ही आनंद आंटीज एकमेकींच्या बहिणीच होत्या सख्ख्या. गोऱ्यापान , काश्मिरी सफरचंदासारखी रसदार त्वचा. एकाच घरात दिलेल्या. पण अस असलं तरीही रोजची भांडण काही चुकायची नाहीत त्यांची. बहिणीपेक्षा जावा जावा हे नातं वरचढ ठरत असायचं .. भांडण झाले की थोड्या वेळाने सगळं आलबेल . या नात्यामुळे राहुल आणि पूनमला( त्याची चुलत बहीण /मावशीची मुलगी) आम्ही मुलं तुम्ही तुमच्या आयांना माँसी बोलावता की चाची म्हणून चिडवायचो. याउलट फूल अंकल आणि आंटी शांत स्वभावचे होते. मुलगा अमेरिकेत असल्याने इतरांशी जेवढ्यास तेवढे संबंध !!!
नवरात्रात मात्र आम्हाला विशेषतः मुलींना या दोन्ही कुटुंबाकडून एकदम राजेशाही ट्रीटमेंट ! याच कारण माताजींच दोन्ही कुटुंब एकदम भक्तिभावपूर्वक करायची. उधळलेल्या खोंडागत वागणारा राहुलही यावेळी एकदम शांत असायचा. साधारणपणे नवरात्रीच्या पाचव्या , अष्टमी , नवमीला आम्हा मुलींना स्पेशल आमंत्रण ! सकाळी एक १० च्या सुमारास मुलींच्या आयांना विचारून बोलवून घेतलं जायच. ६०च्या जिजी आणि दोन्ही आंटीज जातीने आमचे पाय वगैरे धुवून स्वच्छ करायच्या. मग माताजींका टिका लावायचा. प्रत्येकीला गुलाबाची फुल द्यायची ! देवीप्रमाणे पूजा करून ओवाळून घ्यायचं आणि आमच्या पाया पडायचं. खरी गंमत पुढे.. प्रत्येकीला हेअरक्लिप , नेलपेंट , पैसे ( प्रत्येकी ५ रुपये) , रुमाल, चुनरी अस काही ना काही मिळायचं. त्यावेळी पॉकेटमनी नामक हा प्रकार नव्हता. त्यामुळे ते मिळालेले आखे ५ रुपये मी माझ्याकडेच ठेंवणारे अस मी जाहीर करूनच यायचे. वर्षातून एकदाच हे सगळं असल्याने मातेची पण काही आडकाठी नसायची. हेअर क्लिप वगैरे मधून खास पंजाबी चॉईस दिसायची. सगळं एकदम चमचमीत आणि भडक. मला अजून आठवतं नवीन लग्न होऊन माझी मावशी आमच्याकडे आलेली . तेव्हा तिने टिपिकल ममव पद्धतीने मोजकेच दागिने आणि हलका मेकअप केलेला. दरवाज्यावरच फूल अंकल भेटले. त्यांनी तिला " बिटीया , नई नई शादी हुयी है तो कुछ अच्छे कपडे पहानो करो, दुलहन जैसी लगने चाहीये " असा सल्ला दिलेला. ते आठवून आम्ही आजही असतो. तर ते देवीचं सगळं अस भेटवस्तू मिळणं पंजाबी स्टाईलच. दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेलो की दोन दिवस त्यावर चर्चा ठरलेली. या भेटवस्तूबरोबरच खास पंजाबी पद्धतीचा भरपूर तूप निथळत असलेला गव्हाचा शिरा, त्यासोबत पुऱ्या आणि चण्यांची भाजी. या खाण्यात वगैरे मला इंटरेस्ट कमी असल्याने मी ते सरळ आईला नेऊन द्यायचं काम करायचे. तर 'मोठं' होईपर्यत हे सगळं अनुभवलं . त्यादिवसात पाया पडून घेणं, पूजा करवून घेणे हा आपला हक्क आहे असेच वाटायचं. बंधूरायांना या दिवसात फिलिंग जेलसी यायचं ते भांडण होईपर्यंत टिकायचे. कारण त्यांच्या हाती भोपळाच ..
सोसायटीच्या टॉवरपूर्व काळात ही दोन्ही कुटुंब भाईंदरवगैरे भागात राहायला गेली. तिथून पुढे काहीच संपर्क राहिला नाही. सगळे मोठे झाले . पूनमकी शादी हो गयी ( तिचं ते स्वप्न होतं) , फूल अंकल ह्या जगात नाहीत इतकंच कळलं. नवरात्र म्हटली की आठवतं ते इतकंच !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा