Quick watercolors after a while..
शुक्रवार, २ जुलै, २०२१
इरफान !!!
नेटफ्लिक्सवर तलवार चित्रपट (पुन्हा एकदा) बघत होते. चित्रपटाबद्दल प्रश्नच नाही . मूळ घटना हीच एक "सक्सेसफुल (?) " आडातील गूढकथा असल्याने पोहऱ्यातील चित्रपटदेखील जमलाच आहे.
आनंदछंद ऐसा़
खरंतर या छंदाची ओळख लोकल प्रवासातून झालेली . लोकलने प्रवास करत असताना अनेक विक्रेते १० रुपये मैं कलरिंग बुक्स म्हणून ओरडत विकायला येत , आजही येतात.त्यात टॉम जेरी सारख्या कार्टूनची , बॅटमन ,आर्यनमॅन सारख्या सुपर हिरोजची , फळा ,फुलांचा चित्रांचा समावेश असतो . ह्या रंगकामाच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश लहान मुलाना रंगकाम , चित्रकामची ओळख करून देणे इतका असतो . त्यामुळे त्यात कुठच्या चित्राला कुठला रंग द्यायचा हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं. लहान मुलं चित्र रंगवत शांत बसावीत हा ही एक उद्देश असावा
तर नेटवर बागडत असताना coloring activity या प्रकरणाचा शोध लागला .थोडं डोकावून पाहिलं असता अरे हे तर लोकलमध्ये विकतात त्याच छापाच आहे की असा प्रथमदर्शनी ग्रह झाला .त्यामुळे थोडं हसायलाच आलं . त्यात ही ऍक्टिव्हिटी स्ट्रेसबस्टर म्हणून केली जाते असंही लिहिलेलं . 'काय बाई , एकेक प्रकरण ' म्हणून सोडून दिलं .
अशातच प्राजक्ता पाटवेशी ओळख झाली . तिच्या पोस्टसमधून , चित्रातून ती अतिशय गुणी कलाकार असल्याचंही समजलं . त्यावेळी ती आणि अजून एक मायबोलीकर अल्पना या दोघी मिळून त्यांचं कलेशी संबंधित फेसबुक पान सुरू करत होत्या . असच एकदा प्राजक्ताशी गप्पा मारत असताना तिने तिच रंगकामाची पुस्तकं दाखवली . तेव्हा "अरे ! हे तर नेटवर बघितलेलं तेच की " ट्यूब पेटली . तेव्हा तिच्याकडून हे नक्की काय प्रकरण असतं हे समजून घेतलं . तिच्याशी बोलून बरच काही समजलं . त्यांनंतर दोस्तीखात्यात तिने तिची नुकतीच प्रसिद्ध झालेली ही कलरिंग पुस्तकं भेट म्हणून दिली.
तर coloring activity for adults हा छंद पाश्चिमात्य जगात बराच लोकप्रिय आहे. प्राजक्ताने बोलता बोलता तिने 2/3 फेसबुक ग्रुपची लिंकही दिली. हे ग्रुप पूर्णपणे ह्या छंदप्रकाराला वाहिलेले आहेत . तिकडचे रंगकाम बघून थक्क व्हायला होतं . वेगवेगळ्या देशातील लोकं ज्या उत्कृष्टपणे वेगवेगळ्या प्रकारचेरंगकाम करतात ते बघून परफेक्ट एवढंच मनात येतं. ह्या ग्रुपमुळेच ह्या छंदाला मी गांभीर्याने घेतलं .
प्राजक्ताने पुस्तक तर दिली पण माझी सुरुवात ग भ म न पासून होती . त्यामुळे तिला निरनिराळ्या शंका विचारून जेरीस आणलं . त्यात कोणते रंग वापरू , माध्यम कोणतं , कुठून सुरुवात करू , चुकलं तर काय करायचं असे वेगवेगळे प्रश्न विचारून पिडलं . ( तिला मला या छंदाची माहिती देण्याचा निश्चितच पश्चताप झालेला असणार )
शेवटी camelin कंपनीच्या रंगीत पेन्सिल विकत आणल्या . आणि श्रीगणेशा केला . पहिलच चित्र रंगवलं आणि हे आपल्याला बऱ्यापैकी जमतंय याचा अंदाज आला .वर उल्लेख केलेल्या फेसबुक ग्रुपात ते चित्र टाकलं . तर तिथल्या लोकांना आवडलं . थोडा हुरूप आला आणि पुढचं चित्र रंगवायला घेतलं . ते ही जमलं .
हे पहिले चित्र रंगवलेल !!!
हळूहळू मला ही रंगकामाची ऍक्टिव्हिटी आवडायला लागली . मजा येऊ लागली . लहान मुलांच काम म्हणून अडगळीत टाकलेल्या ह्या छंदाने एक प्रकारचं रिलॅक्स फिलिंग दिलं . सातवीनंतर चित्रकला सोडूनच दिलेली . ती ह्या प्रकारात सापडली .रंगाचा सेन्स माझा चांगला आहे असे अनेक मित्र मैत्रिणी आवर्जून सांगतात . तो इथे रंगवताना कामी आला . प्राजक्ताच्या पुस्तकातली चित्र सुंदर आहेत त्यामुळे ती तितक्या सुंदरपणे रंगवली गेली पाहिजेत असंही मनाशी ठरवून घेतलं . त्यामुळे अजून मजा यायला लागली .
चित्र रंगवताना सध्या मी रंगीत पेन्सिलचा मुख्यतः उपयोग करते . पण अजूनही अनेक माध्यम वापरता येतात . जस की जेल पेन्स, स्केच पेन्स , रंगीत खडू . . कोणतं माध्यम वापरायचे ते आपल्यावर . शेवटी आनंद मिळणं महत्वाचं.
Coloring Activities मध्ये मंडल हा प्रकार लोकप्रिय आहे . मंडल हे गोलाकार आकारात असलेला वेगवेगळ्या फॉर्ममधला एक प्रकारचा चित्र प्रकार आहे. हिंदू , बौद्ध, जपनीज संस्कृतीत ह्याच मूळ सापडत . अधिक माहिती या लिंकवर मिळेल
https://en.m.wikipedia.org/wiki/Mandala
ही मी रंगवलेली दोन मंडल !!!
१)
२) भाचीचे रंगीत खडू ढापून नुकतंच एक चित्र रंगवलं आहे . हे ते चित्र मंडल
हे अजून काही रंगकामचे नमुने .
Coloring app म्हणून प्ले स्टोर वर सर्च केल्यास अनेक app दिसतात . त्यावरूनही हा छंद जोपासता येऊ शकतो. पण त्याला कागदावर रंगवलेल्या रंगकामाची सर नाही हे अनुभवातून सांगू शकते
हे रंगकाम करताना मजा येते हे खरं . चित्रावर फोकस करून रंगकाम करण्यात धमाल आहे.. पेशन्स या घटकाची कमतरता असलेल्या प्रत्येकाला ही ऍक्टिव्हिटी उपयुक्त आहे. नेटवर अतिरिक्त बागडून डोळे , मेंदू शिणवण्यापेक्षा तोच वेळ एक चित्र किंवा चित्रांचा तुकडा रंगवून पाहिलं तर छान वाटतं . मी माझी काही चित्र अशीच टप्याटप्यात पूर्ण केलीत .दुसरं एक म्हणजे हा छंद फार काही खर्चिक नाही . अमेझॉन , फ्लिपकार्टवर, क्रॉसवर्डमध्ये , प्राजक्ताच्या फेसबुकपेजवर रास्त किंमतीत विविध प्रकारची कलरिंग बुक्स, रंगीत पेन्सिल , खडू उपलब्ध आहेत . कुठेही लांबच्या प्रवासात ही रंगकाम ऍक्टिव्हिटी वेळ घालवायचा उत्तम मार्ग आहे . काही
तर सर्वांना Happy Coloring !!!
ऊन
ऑफिसातला एक नेहमीचा दिवस . कटकट करणारे सीनियर्स , नेहमीच्या डेडलाईनची रडारड , एसीची गोठलेली हवा , या सर्वात डोक्यात प्रश्नांचं भेंडोळ जमलेल असताना चेहऱ्यावर दिसू न देण्याची कॉर्पोरेट कसरत करत असलेले आपण . एका क्षणी डोक्यातल काहूर चेहऱ्यावर पसारायला सुरुवात होते. स्क्रीन धूसर दिसू लागते . डोळे जड होतात . पटकन फ्रेश होऊन येण्याच्या नावाखाली पाऊले वॉशरूमची वाट चालू लागतात . पण तिथून येऊनही काही होत नाही . सुरुवातीचं लो फिलिंग आता सिंक होऊनच थांबणार काय इतपत प्रकरण येतं .
आणि तेव्हाच टिंग टॉंग होतं .
फोन आपल्याच मातोश्रींचा असतो जीच्याबरोबर सकाळी पेल्यातल्या वादळाची नांदी झालेली असते . ह्म्म्म असा मनाशीच बोलून फोन उचलला जातो . पलीकडून प्रेमळ आवाज येतो . पेल्यातल वादळ अजूनही आपल्या डोक्यात असतंच . त्यामुळेच पलीकडच्या आवाजात एक आर्जवयुक्त सावधानता असते . ( इतक्या वर्षात माता आपल्याला ओळखू लागलेली असतेच . शेवटी तिचीच नाळ वगैरे ) आपल्या धुमसत्या बाळाने परत राख घालून घेऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीने बोललं जातं . त्या मूळच्या प्रेमळ आवाजामुळे आपल्याही चेहऱ्यावर हळूहळू दुधाची साय पसरत जाते . एकदम झाले मोकळे आकाश फिलिंग येतं . नकळत बर वाटायला लागत . हवं असलेलं विचारून फोन ठेवला जातो.
इथे मात्र आपल्या मनात श्रावणाच मोकळं , स्वच्छ , लख्ख ऊन पसरलेलं असत ...
चवीचं डॉक्युमेन्टेशन !
तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं मात्र अत्यावश्यक!
पुढे यथावकाश चहाने आयुष्यात एंट्री घेतली . चहा आवडू लागला .मात्र अस्मादिकांचे चहा पिण्यातले नखरे बघून स्वतःचा चहा स्वतःच बनवायचा असं फर्मान निघालं. खरेतर चहा किंचित चॉकलेटी पांढरा असायला हवा , खूपप गोड नको , त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नको आणि "ताजाच" हवा , ज्यादा उकळलेला नको या अटी फार नव्हेत असे आमचे प्रांजळ मत आहे .पण हाय ये जालीम दुनिया ! तर ते असो ..
अश्या "नखऱ्या"मुळे हवा तसा परफेक्त चहा मिळणं दुरपास्त .स्वतः उठून खटपट करायचा कंटाळा आणि त्यामुळे चहा पिण्याचं प्रमाण कमी !
पण एकदा गंमत झाली . फायनल इयरच्या वेळी आजींना सोबत म्हणून आमच्या खोलीत अभ्यास करशील का अशी विचारणा नवीन शेजाऱ्याकडून (पक्षी :- आठल्ये काका )झाली .त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते .खरेतर आम्हीच त्या सोसायटीत नवे होतो. शेजारी चांगले होते त्यामुळे आढेवेढे घ्यायचा प्रश्न नव्हता . संध्याकाळी 4 ची वेळ होती. त्यामुळे चहा घेणार असा प्रश्न समोर आला . माझे चहा प्यायचे नखरे स्वतःला माहित असल्याने "नको नको" असं घुटमळून म्हणाले . तर मी नवीन असल्याने लाजतेय असा अर्थ आठल्ये काकांनी काढला . आणि माझ्या नकाराची दखल न घेता थोड्या वेळाने चहाचा कप समोर आणून ठेवला.
तो चहा बघताक्षणीच अरे आपल्याला हवा तसाच रंगाचा चहा आहे की असा उद्गार तोंडातून निघाला. "मात्र दिखावेपे मत जाव " असाही मनाने इशारा दिला .
तर चहाचा पहिला घोट घेताच वा ! हा माझा चहा असा जिभेने कौल दिला . मला हव्या तश्या पांढऱ्या चॉकलेटी रंगाचा , ज्यादा उकळी न आलेला ,कुठलेही मसाले घालून चव न बिघडवलेला असा तो चहा होता . नाही म्हणायला गवती चहाच पात होतं पण त्याने चव अजूनच एंहान्स झालेली . चहा आवडल्याने काकांना तस ताबडतोब सांगूनही टाकलं . ते फारच खुश झाले . आणि मग संध्याकाळचा चहा तू आमच्याकडेच घे असं निमंत्रणही दिलं .
आठल्ये काकांना चहा करायला फार आवडायचं . एखादी सुगरण तिची सिग्नेचर रेसिपी मन लावून करते त्या तन्मयतेने ते चहा करायचे . जीव ओतून चहा बनवल्याने त्यांचा चहा परफेक्त बनायचा आणि ती तन्मयता चहात उतरायची . ती फिकट तरीही किंचित गोडूस अशी चव अजूनही जिभेवर आहे .तसा चहा मी नंतर कुठेच प्यायले नाही . अगदी आठल्ये काकूंना पण तसा चहा जमायचा नाही . चहाच डिपार्टमेंट काकांकडे आहे असं त्या गंमतीने म्हणायच्या .आणि ते खरच होतं .चहा करायचा कंटाळा आलाय हे वाक्य चुकूनही त्यांच्या तोंडून ऐकलं नाही . अर्थात त्यांना स्वयंपाकघरातलं तेवढंच यायचं पण त्यातील मास्टरीवर ते स्वतः आणि इतरही खुश होते.
संध्याकाळी बाहेर कामं असल्याने अगदी रोज नाही तरी वरेचवर आठल्येआजींना सोबत जावं लागायचं .त्यांनी केलेला चहा मला आवडतो हे ठाऊक असल्याने काका माझा चहाचा कप तयार ठेवायचे . त्यांच्या या उत्साहाचं , कधीही न बिघडणाऱ्या रेसिपिच कौतुक केलं की ते फार खुश व्हायचे .
मला तुमच्यासारखा चहा बनवायला शिकवा असं मी सांगून टाकलेलं .आणि त्यांनीही ते कबूल केलेलं . मात्र ते कधीही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वर्क आउट झालंच नाही .तर ते राहूनच गेलं .
पुढे आम्ही ते घर बदललं आणि सगळंच थांबलं .तशीही चहाची सवय नसल्याने फार काही अडत नव्हतं.
मग साध्या आजाराचं निमित्त होऊन आठल्ये काका गेले आणि पाठोपाठ तो चहाही गेला . तसा चहा नंतर कुठेच मिळाला नाही .अगदी रेस्तराँमध्येही नाही .चहाची रेसिपी अशी काही अवघड नसली तरीही आठल्ये काकांची चहा करण्यातील असोशी /आवड त्यात नसल्याने ती चव जिभेवर पुढे आलीच नाही .माझी आजी म्हणायची तस स्वयंपाक चवदार होतो ते करण्याऱ्याच्या तन्मयेतेमुळे . त्याला चव असते .
मग आठल्ये काकांच्या चहाच्या रेसिपीच डॉक्यूमेन्टेशन झालं असत तरीही त्या चवीचं /त्या तन्मयतेच डॉक्युमेन्टेशन कुठून आणायचं होतं ?
बासुरीवाला
"यशोमती मैया से पुछे नंदलाला , राधा क्यो गोरी मैं क्यू काला "
आज इतक्या दिवसांत बासुरीवर हे सूर ऐकले. करोनापूर्व काळात एक बासुरीवाला रोज बासुरीवर वेगवेगळी गाणी वाजवत सकाळी रस्त्यावर फेरफटका मारायचा. ऑफिसच्या आवराआवरीची वेळ आणि त्याची यायची वेळ जवळपास सारखीच असायची. आणि गाण्यातही व्हरायटी ! कधी परदेसी परदेसी जाना नहीं तर कधी अजीब दास्ता है ये . माझं घर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असल्याने त्याचा चेहरा कधी दिसला नाही पण सूर मात्र कानावर जरूर पडत.
नंतर लॉकडाऊन आला . वर्क फ्रॉम होम कधीही केव्हाही सुरू झालं आणि वेळाच बदलून गेल्या. त्याचबरोबरीने त्या वेळेना असलेलं सिंक्रोनायझेशन पण हरवलं . गेल्या 3 ते 4 महिन्यात एकदाही बासुरीचे सूर ऐकायला मिळाले नाहीत . लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या उत्साहात , नंतरच्या कंटाळ्यात , त्याही नंतरच्या वैतागात आपण हे सिंक्रोनायझेशन मिस करतोय हे लक्षातच आलं नाही. कळत नकळतपणे माणसं , भवताल कुठे कशी जोडल जात हे विसरूनच जायला झालं. कुठेतरी काही हरवूनच गेलं.
करोनाने हे सगळं हिरावून घेतलं म्हणायचं तर करोनापूर्व काळात आपण ह्या गोष्टीला तितक कधी महत्व दिले होते का हा प्रश्नही पडला. करोनाने हे सगळं बंद झालं की आपल्याला ह्या म्हटलं तर लहान असलेल्या गोष्टीची किंमत दाखवून दिली असा पेच पडलाय आता. किती सहजपणे आपण गोष्टी गृहीत धरतोय हे ही नीटच कळत गेलं.
आज इतक्या दिवसांत तो बासुरीवाला पुन्हा आला . त्याचे सूर आजही तसेच परफेक्ट होते. पण आज त्या सुरांनी हे संकट टळेल , कुठंतरी हे सगळं पुन्हा नीट चालू होईल , फिर वो सुबह आयेगी असा विश्वास वाटला आणि बरच वाटलं .
त्या बासुरीवाल्याला मी कधी पाहिलेलं नाही . पण त्याचे सूर ओळखीचे आहेत. उद्या परवा परत आला की धावत जाऊन एक छोटी का होईना बासुरी विकत घेईन . वेडगळपणाच वाटलं तर असू दे पण बाहेरचा आणि आतील भवताल जिवंत ठेवायला हे गरजेचं आहे हे मात्र नक्कीच .
शुक्रवार, १४ मे, २०२१
पोह्याचे कटलेट / Poha Cutlet
काल सुट्टी / वेळ असल्याने काहीतरी चटपटीत आणि झटपट होणारं (फार वेळ न खाणारं) करू म्हणून नेट सर्फिंग केलं तेव्हा पोह्याचे कटलेट सापडले. साहित्याचा अंदाज घेतला तेंव्हा बरेचसे साहित्य घरात आहे अस लक्षात आलं. पोहा कटलेटच्या रेसिपी ढिगाने नेटवर सापडतील . कोणतीही रेसिपी फॉलो करू शकता. मी दोन तीन रेसीपी बघून शॉर्टकट मारला.
Yesterday, as it was a holiday / time, I was surfing the net to do something spicy (and of course would not take a long time for preparation). Internet suggested "Poha Cutlet". Then i had figured out about ingredients and realized that most of the ingredients were available. I read two / three recipes and took shortcut.
So here is the recipe :
First boil potatoes and peel them. Soak Poha, drain the water and set aside for 5 minutes. Now mix the boiled potato pulp in that poha. Mix turmeric powder, chilli powder, garam masala, chaat masala, ginger garlic paste, black pepper powder, salt, cilantro, carrot (optional). Knead the pulp well and make small balls as per your liking.
Mix the prepared balls in a mixture of corn flour and breadcrumbs, respectively. Shallow / deep fry as you like in the pan. You can also bake in the oven. Serve with sauce or chutney. I had mint chutney and these cutlets went well with it.
Quantity: According to everyone's taste and preference
हा फोटो / Here is photo
गुरुवार, ८ एप्रिल, २०२१
सखुबत्ता
मैत्रिणीने कोणे एके काळी तिची हिट रेस्पि पोस्ट करावी, ती आपण बघून आपल्या आवाक्यातील आहे असे म्हणून मनातल्या मनात मांडे खावेत. पण रेस्पिच्या घटक पदार्थच आणि चालू वर्तमानतील घटकांच प्रमाण जुळून येऊ नये . मग आपल्या कुकरच्या शिट्टीसारख्या उतू चाललेल्या उत्साहावर फसकन पाणी पसरावं. पण आपण पण हार न मानता छोडेंगे नै जी म्हणत ती रेस्पि बुकमार्क करून ठेवावी.
काही काळानंतर आपल्याला रेसीपीचे घटक पदार्थ आणि चालू वर्तमानातील पदार्थ घरात आहेत आहेत याचा साक्षात्कार व्हावा आणि टीशर्ट खोचून सज्ज व्हा उठा उठा , सैन्य चालले पुढे करत स्वयंपाकघरात एन्ट्री मारावी आणि मग बऱ्याच दिवसांनी पेंडिंग असलेला सखुबत्ता एकदाचा करावा.
तर मैत्रिणीची रेसिपी पुढीलप्रमाणे :
कैर्यांची सालं काढून पातळ काचर्या कराव्यात. सोलाण्याने काचर्या केल्या तरी चालेल. तीळ भाजून त्याचे अर्धी वाटी कुट घ्यावे. कुटाइअतकाच कैरी लोणचे मसाला (बेडेकर, प्रविण किंवा इतर आपल्या आवडीप्रमाणे) घ्यावा. लोणचे मसाला नसेल तर लाल तिखटही चालेल . मी तेच घातलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त गुळ किसून घ्यावा. गुळाचं प्रमाण अंदाजेचं चवीप्रमाणे ठरवा. कैर्यांच्या काचर्या, तिळाचं कुट, लोणचे मसाला, मीठ आणि गुळ एकत्र करावं. त्यात हिंग- मोहरीची फोडणी थंड करून घालावी. तयार होतो गोड आंबट स्लर्प चवीचा अप्रतिम सखूबत्ता!
रोजच्या भाजीचा कंटाळा आला असेल , रोजच्या डाळभाताबरोबर आणि खूप काही न करता स्लर्प चव हवी असेल तर ही रेसिपी करावी . नुसती बचकाभर अशीच संपते. भांड्याचा तळाचा खारही चविष्ट लागतो आणि चाटून पुसून भांड अगदी स्वच्छ होतं.
हा मी केलेल्या सखूबत्ताच्या फोटो आणि माझ्या मैत्रिणीच नाव Alpana Khandare
मंगळवार, ६ एप्रिल, २०२१
गाजराची पचडी
रेसिपी सौजन्य - मायबोली साईटवरील माहिती
लहान मुलीची लहान पोळी
आज पोळ्या करण्याऱ्या काकूंनी ही गंमत केली आणि ते न सांगता. !.जेवायला बसत असताना पोळ्यांचा डबा उघडला आणि एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आलं ..
पेज / खिमाट
पेज / खिमाट या नावाने ओळखल जाणारा हा कोकणचा स्टेपल फूड म्हणता येईल असा पदार्थ . आईच्या म्हणण्यानुसार तिच्या लहानपणी कोकणातील गावात न्याहारीला सर्रास पेज असायची . एक / दोन वाडगाभर पेज पिऊन माणसं शेतावर जायची. कधी मधी बदल म्हणून भाकरी आणि त्याच्या जोडीला सुक्या बांगड्याचा तुकडा .
रविवार, ४ एप्रिल, २०२१
साडीची गोष्ट !!!
माझ्या लहानपणी माझी आई ऑफिसात साड्याच नेसून जायची. मध्यमवर्गात त्या काळात सलवार सूट घालणे म्हणजे क्रांती . त्यातूनही सरकारी हापिसात ड्रेस घालणे म्हणजे contempt of court. मला आठवतंय मी एका कामानिमित्त अंधेरीत असलेल्या सीमाशुल्क ऑफिसात जीन्स घालून गेले होते. खरंतर मुद्दाम अस काही केलं नव्हतं. त्यावेळी खरंतर लक्षात आलं नाही आणि कामाच्या घाईत तेवढा वेळही नव्हता. तर तिथल्या सरकारी बाबूंनी कुठला परग्रहावरील माणूस इथे आला असा लूक दिलेला. (माझं लहानपण ते उच्चशिक्षण होऊन य वर्ष लोटली तरीही . तर त्या अश्या सगळ्या प्रकारांमुळे कितीही वेळ झाला तरी आई साडीच नेसायची. आता साडी नेसण म्हणजे वेळखाऊ काम. परकर , ब्लाउज , पिन वगैरे सगळं रेडी ठेवावं लागतं. त्यात माझी आई म्हणजे एकदम भारी काम . साडी नीटच व्यवस्थित नेसली पाहिजे असा तिचा बाणा. सकाळची स्वयंपाक त्यात हे साडी प्रकरण. त्यामुळे ती लवकर उठून सगळं करायची. तिची ती सगळी लगबग गडबड बघून मला साडी या प्रकाराबद्दल फारसं ममत्व नव्हतं. सकाळच सगळं करून, साडी नेसून ठरलेली ९.१५ ची ट्रेन गाठणं हे तीच रुटीन. तर मला एवढ्या सकाळच्या घाईत तिची साडी नेसायचीच जबरदस्ती काही झेपायची नाही. पण त्याच्या मागच कारण मला नंतर कळलं जे वर लिहिलं आहेच. माझ्या आईला साडी ते सलवार सूट अस ट्रान्सफॉर्मेशन करायला माझं सीएस पूर्ण व्हावं लागलं. ते ही तिला खूप कंव्हीस केल्यावरच.
कही कही से
"हाय दोस्तो , वेलकम टू ९२.५ म्युझिक एफ एम. मैं हु आपकी दोस्त शिरीन ! शिरीन द ग्रेट. व्हॉट अ वंडरफुल डे ! क्या मौसम है , क्या नजारा है . तो चलो इसी बात पे we are now move further part of our favorite show . जैसे की आप सब लोग जानते है की शो का नाम है "आपकी पसंद " तो चलो चलते है नेक्स्ट कॉलर की रिक्वेस्ट की और. जो की सुनना चाहते है ये ब्युटीफुल गाना . आय एम शुअर आपको भी ये गाना पसंद आयेगा . So enjoy and keep listening.
जो भी इसको पहन ले वो अपना-सा लगता है
चलता-फिरता शहर अचानक तनहा लगता है
जैसे इनसे अपना कोई रिश्ता लगता है"
जो भी मिलता है कुछ दिन ही अच्छा लगता है
मंगळवार, २३ मार्च, २०२१
Neerdosa \ Ghavane\घावणे
तुला स्वयंपाकामधलं काय येतं अस कोणी मला विचारलं तर मला घावणे उत्तम जमतात अस उत्तर मिळतं. घावणे ही कोकणातील स्पेशालिटी . तांदूळ भिजवून , वाटून बिडाच्या / निर्लेप तव्यावर घावणे घालणं हे सुख.. त्यामुळे जेव्हा केव्हा पॉटलक इव्हेंट असतो तेव्हा न बिघडणारी , दगा न देणारी ही भरवश्याची म्हैस नेहमी तयार असते . याचे फायदे असे की i have made authentic cuisine of Konkan अस मिरवता येतं आणि भाव खाता येतो.
If I am asked, what is your specialty in kitchen, then instant answer is Ghavane a.k.a Neerdosa. Ghavane a.k.a Neerdosa is konkan regional cuisine. . Recipe is simple. Soak rice overnight, then grind, add some salt and spread the same on nirlep pad or bhidacha tawa. This is easy recipe and in which never failed by God's grace.
So here presenting my Neerdosa \ Ghavane\घावणे. Hope you like it
जलरंगातील बुकमार्क्स ! / Bookmarks in Watercolor
२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे वेळ होता आणि साहित्यही हाताशी होतं . त्यानिमित्ताने हॅन्डमेड कागदावर हे जलरंगातील बुकमार्क्स तयार केले होते. तेच आता इथे टाकतेय.कसे वाटले ते नक्की सांगा .
World Book and Copyright Day is a celebration to promote the enjoyment of books and reading. Each year, on 23 April, celebrations take place all over the world to recognize the scope of books. Lock down had given opportunity of time plus i had material. So I prepared these bookmarks on handmade paper. Tell me how do you find it !
Decoupage
Royal Challenge whisky turned into Decoupage !
सोमवार, २२ मार्च, २०२१
नवरात्र
नवरात्रीच्या विशेष अश्या आठवणी म्हटल्या की आठवतं ते गरबा , बाजारातील धांदल , मामांचे उपवास, जोडून येण्याऱ्या सहामाही परीक्षा, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास त्यानंतरच्या दिवाळी सुट्टीच आकर्षण . पण जरा स्मृतीला ताण दिला की अजून आठवतात ती फूल (हेच आडनाव होतं) आणि आनंद ही आडनावं असणारी पंजाबी कुटुंब.
वाट
चिडचिड सहन करणारी आई
जनरलायझेशन / गृहीतक
जनरलायझेशन / गृहीतक हा लोकांच्या जगण्याच्या एक भाग आहे असं कधी मधी वाटू जातं. आता ह्यात लोकांच्या बिनडोक असण्याच्या भाग किती , डोक्यात घुसलेल्या किंवा घुसडवलेल्या पूर्वग्रहदूषिताचा भाग किती हे नीटस माहीत नाही. X गोष्ट अशी आहे मग त्या अनुषंगाने Y गोष्ट पण तशीच असणार ही गृहीतक बघून मजा येते कधी मधी.
कुलक्की सरबत / kulukki Sarbath
शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे. विशेषतः उन्हाळ्यात तलखीने जीव हैराण होत असताना सब्जा घालून पाणी प्यायलं की गार वाटतं.
केरळमध्ये सब्जा घालून कुलक्की सरबत ( kulukki Sarbath ) करतात. तिथलं हे लोकप्रिय पेय आहे. कुलक्की सरबत हे एक प्रकारचं shaken lemonade म्हणता येईल. मल्याळममध्ये कुलक्की या शब्दाचा अर्थ घुसळणे असा होतो. त्यावरून या पेयाला कुलक्की हे नाव पडलं. हे सरबत तयार करताना जितकं जोरात घुसळल / वर खाली हलवलं जाईल तितकी याची चव खुलते. ह्या पेयाच secret ingredient म्हणाल तर तेच आहे.
२चमचे सब्जा ,
एक ग्लास थंड पाणी जितकं सोसेल तितके,
१ लिंबू ,
१ हिरवी मिरची (ऊभी चिरलेली ) ,
बर्फाचे तुकडे ,
चवीनुसार मीठ , साखर , पुदीना
कृती : 2 चमचे सब्जा पाण्यात भिजवत ठेवा. सब्जा भिजेपर्यत एका ग्लासात लिंबाचा एक स्लाइस , एक उभी चिरलेली मिरची , पुदिना, चवीनुसार मीठ, साखर टाका. ह्यात आल्याचे बारीक तुकडे पण घालू शकता (ऑप्शनल). त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. बर्फाचे तुकडे टाका.
ह्यावेळेपर्यत सब्जा पुरेसा भिजलेला असेल. तो ही या मिश्रणात टाकून मिश्रण हलकेसे हलवून घ्या. आता ग्लासात दोन बोट राहतील इथपर्यंतच पाणी ओता. लक्षात घ्या ग्लास पूर्णपणे भरायचा नाही . नाहीतर घुसळताना पाणी बाहेर पडेल. आता दुसरा एक ग्लास घेऊन तो मिश्रणाच्या ग्लासावर ठेवून अर्धा मिनिटं वर खाली चांगलं हलवून घ्या.पण जरा दमान कारण जोरात घुसळताना पाणी बाहेर पडायचे १०० % चान्सेस असतात. तुमच्याकडे Shaker असेल तर हे काम अगदी सोपं होतं.
तर आपलं साधं सोपं आंबटसर , गोडूस, तिखट अशी मिक्स चव असलेलं कुलुक्की सरबत तयार आहे. हे सरबत थंडगार प्यायला छान वाटत. हवं असल्यास थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता.
हे मी केलेलं कुलक्की सरबत / kulukki sarbat
गुरुवार, १८ मार्च, २०२१
फणसाच्या आठळ्याची भाजी
तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...
-
तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...
-
मैत्रिणीने कोणे एके काळी तिची हिट रेस्पि पोस्ट करावी, ती आपण बघून आपल्या आवाक्यातील आहे असे म्हणून मनातल्या मनात मांडे खावेत. पण रेस्पिच्या...
-
आणि मग एके क्षणी मेंदूने तसेच डोळ्यांनीही शिणवटा आल्याचा निर्वाणीचा इशारा द्यावा . स्क्रीनवरच्या घड्याळ्याकडे पाहून चॅक आवाज काढत आवाराआवर ...